सातारा : पूर्वी झालेल्या वादातून दोघांवर तलवारीने वार करण्यात आले. यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली.सूरज अशोक नलावडे (वय २४) संतोष अण्णा चौगुले (२५, दोघे रा. मंगळवार पेठ, बोगदा परिसर, सातारा) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सूरज आणि संतोष समर्थ मंदिरहून दुचाकीवरून राजवाड्याकडे येत होते. नगर वाचनालयासमोर आल्यानंतर दबा धरून बसलेल्या पाच ते सहाजणांनी सूरज आणि संतोषवर अचानक हल्ला चढविला. सूरजच्या डोक्यात वर्मी घाव बसल्यामुळे तो जागीच कोसळला तर संतोषच्या खांद्यावर आणि चेहऱ्यावर वार करण्यात आले आहेत. राजवाड्यावरील काही नागरिकांनी दोघांनाही तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. रात्री आठच्या सुमारास राजवाड्यावर नागरिकांची वर्दळ होती. या वादावादीमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. शाहूपुरी पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत हल्लेखोर युवक तेथून पसार झाले होते. घटनास्थळी पोलिसांना तलवार सापडली आहे. ती पोलिसांनी जप्त केली. पूर्वी झालेल्या भांडणातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे. जखमी संतोष चौगुलेने पोलिसांना माहिती दिल्यानंतर संबंधित संशयितांची पोलिसांनी धरपकड सुरू केली. (प्रतिनिधी)
साताऱ्यात दोघांवर तलवार हल्ला
By admin | Published: January 22, 2017 11:31 PM