मसूर : उंब्रज पोलीस ठाण्यात मारामारी व गंभीर दुखापत, सरकारी कामात अडथळा यासारखे गंभीर गुन्हे दाखल असणारा व रेकाॅर्डवरील गुन्हेगार तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार असलेल्या गुन्हेगारास बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी उंब्रज पोलिसांनी गुन्हा दाखल करीत गजाआड केले.
ही घटना सोमवार दि. २१ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. सुमित दीपक शिंदे (वय २५, रा. कालगाव ता. कऱ्हाड) असे तडीपार असलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी पाठविलेल्या प्रस्तावावरून डिसेंबर २०१९ मध्ये जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्या आदेशानुसार सातारा, सांगली, कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले होते. तीन जिल्ह्यातून हद्दपार केलेला सुमित शिंदे हा विनापरवानगी उंब्रज भागात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ उंब्रज पोलिसांचे पथक पाठवून या गुन्हेगारास ताब्यात घेऊन अटक केली. ही कामगिरी पोलीस अंमलदार दत्ता लवटे, प्रवीण फडतरे, होमगार्ड अभिजित पाटील, स्वप्निल मोरे यांनी केली आहे.