सातारा : जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार असतानाही तडीपारीचे उल्लंघन करून छुप्या पद्धतीने वावर करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली. अजय देवराम राठोड (वय ३०, रा. लक्ष्मीटेकडी, झोपडपट्टी, सदर बझार सातारा) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अजय राठोडवर दरोडा, जबरी चोरी, दारू विक्री यासारखे गंभीर गुन्हे सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याच्या वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याने त्याला पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी एक वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार केले आहे. मात्र तरी तो सातारा शहरात तडीपारीचे उल्लंघन करून फिरत होता.याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने त्याला अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेने अजय राठोड याला त्याच्या घराजवळून पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पळून जाऊ लागला. अखेर पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले.पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, विक्रम माने, अभय साबळे आदींनी ही कारवाई केली.
तडीपारीचे उल्लंघन करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक, पोलिसांनी पाठलाग करून पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 2:05 PM