सातारा : मोहेंजोदाडोप्रमाणे प्राचीन संस्कृतीचा शोध घेण्यासाठी साताऱ्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले उत्खनन अजूनही संपलेले नाही. सर्व यंत्रणा ‘भूमिगत’ करणारे सातारा हे जणू एकमेव शहर असून, तेच ते रस्ते वारंवार खोदावे लागणे ही ‘अपरिहार्यता’ बनली आहे. अर्थात, खोदकाम कंत्राटदार वगळता कोणताही समाजघटक या उत्खननास अनुकूल नाही. कारण गेल्या चार वर्षांत ‘रुमाल नाकाला-गाडी गॅरेजला’ अशी स्थिती सामान्य सातारकरांची झाली आहे.हडप्पा-मोहेंजोदाडोप्रमाणे प्राचीन संस्कृतीचा शोध लागो न लागो; प्राचीन ‘कार्य’संस्कृतीचा शोध मात्र सातारकरांना लागला आहे. कोणत्याही शहरात कधीच पाहिली नाही, अशी ही कार्यसंस्कृती चार वर्षांहून अधिक काळ संतप्त सातारकरांचा मुकाबला करत अजूनही खिंड (नव्हे खड्डे) लढवीतच आहे. भूमिगत कामे संपली; आता नवे रस्ते होणार... आता कोणालाही कोणत्याही कामासाठी खोदकामाची परवानगी दिली जाणार नाही, असे इशारे ऐकून सीलकोटचे गुळगुळीत रस्ते सातारकरांच्या स्वप्नात येऊ लागले; परंतु हे स्वप्नही आता भंगले आहे. भानावर आलेले सातारकर पुन्हा एकदा नाकाला रुमाल लावून सज्ज झाले आहेत. काही ठिकाणी सीलकोटही यांत्रिक टिकावासमोर टिकाव धरू शकले नाहीत. महाराष्ट्र ‘आ’जीवन प्राधिकरणाने आपल्या शब्दकोशातच ‘अंतिम मुदत’ हा शब्द नसल्याचे सिद्ध करून दाखविले. मे महिन्याच्या १५ तारखेची मुदत सलग तीन वर्षे निग्रहाने धुडकावून लावली. नागरिकांसह नगरसेवकांचाही रोष खुल्या दिलाने झेलला; पण कार्यशैलीत बदल केला नाही. ‘महावितरण’नेही उत्खननात सहभाग घेतला आणि अॅनाकोंडासारख्या जाडजूड वाहिन्या जमिनीखाली पसरल्या. त्यांचे अवशेष कुठेकुठे रस्त्याच्या वरही दिसतात. रिलायन्सने उत्खनन करायचे की नाही, यावर बराच खल झाला. बीएसएनएलने मधल्या मध्ये आपला ‘वाटा’ उचलला. इतक्या वेळा रस्ते वेगवेगळ्या कारणांसाठी खोदले गेल्यानंतर आता एखादा रस्ता कोणत्या कारणासाठी, कोणत्या यंत्रणेमार्फत खोदला जात आहे, हेही कळेनासे झाले आहे. अर्थात, सातारकरांना त्यात रसही राहिलेला नाही. फक्त रस्ता खोदला जातो आहे, एवढेच नागरिक हताशपणे पाहतात. हाडे खिळखिळी होणे, गाड्यांची वाट लागणे, नाका-तोंडात धूळ जाऊन वेगवेगळ््या आजारांचा मुकाबला करावा लागणे, अशा प्रयोगांनी सातारकर भलतेच ‘टणक’ झाले आहेत. काही ठिकाणी एकाशेजारी एक असे दोन समांतर चर एकाच वेळी खणल्याचे उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत आहे, तर काही ठिकाणी रस्ता दोन्ही बाजूंनी दोन वेगवेगळ्या कारणांसाठी खोदला गेला आहे. टायरविक्रेते आणि गॅरेजवाल्यांचा मात्र फायदा झाला आहे. (प्रतिनिधी)खोदकाम कुणाला फायदेशीर?शहरात वर्षानुवर्षे सतत सुरू असलेले खोदकाम कुणाच्यातरी दृष्टीने फायदेशीर असणार, असा आरोप नागरिकांकडून आता होऊ लागला आहे. चार वर्षांपासून एका पाठोपाठ एक रस्ते खोदले गेले. मुजवले गेले. पुन्हा दुसऱ्या यंत्रणेकडून खोदले गेले. सर्व कामे एकाच वेळी करता येणे शक्य नव्हते का, असा प्रश्नही वारंवार विचारला गेला. मात्र, त्यालाही उत्तर न देता ‘प्राचीन कार्यसंस्कृती’ सुरूच राहिली. आता मुख्य रस्त्यांनी सीलकोटची मऊ शाल पांघरायला सुरुवात केली असताना पुन्हा एकदा खोदकामे सुरू झाल्याने ते नक्कीच कुणाच्यातरी पथ्यावर पडते आहे, अशी उघड चर्चा सातारकर करू लागले आहेत.
सातारकरांचा टाहो.. रस्ता नको; धूळ आवरा
By admin | Published: February 04, 2015 10:26 PM