लोणंद : फलटणचे तहसीलदार विजय गणपत पाटील यांना शनिवारी रात्री फलटण तालुक्यातील तडवळे गावच्या हद्दीमध्ये शासकीय कामात अडथळा आणून धक्काबुक्की तसेच बनावट वाळू वाहतूक पास दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी लोणंद पोलिस स्टेशनमध्ये तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत युवराज खराडे (रा. तडवळे, ता. फलटण) यास अटक केली आहे. याबाबत लोणंद पोलिस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी की, फलटणचे तहसीलदार विजय पाटील हे तलाठी सुभाष अहिवळे, सचिन जाधव, विनायक गाडे यांच्यासह शासकीय वाहनातून अनधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक कारवाई सुरु केली आहे. शनिवारी रात्री, कुरवली धरण येथे तपासणी करून ८.३० वाजण्याच्या सुमारास तहसीलदारांच्या पथकाने ढवळ येथे अनधिकृत वाळू वाहतूक करणारा ट्रक जप्त केला.यावेळी चालकास शासकीय वाहनातून लोणंद पोलिस स्टेशनला आणून ट्रकमधून अनधिकृतपणे चार ब्रास वाळू चोरून नेत असल्याप्रकरणी व तहसीलदारांना धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणून फसवणूक केल्याप्रकरणी चालक भरत युवराज खराडे (रा. तळवळे, ता. फलटण) ट्रक मालक विजयकुमार हाके व खाणपट्टा धारक अमोल येळे या तिघांवर लोणंद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी चालक भरत युवराज खराडे यास अटक केली आहे. ट्रकदेखील ताब्यात घेतला आहे. फलटण प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर भरत खराडे यास हजर केले असता तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभांगी कुंटे या करत आहेत. (प्रतिनिधी) अधिकाऱ्यांवरच गुन्हा दाखल करेन... संबंधित ट्रक अनधिकृत वाळू वाहतूक करत असून, ट्रक तहसील कार्यालयात जमा करावा, असे चालकास सांगितले असता ‘कोण तहसीलदार.. मी ओळखत नाही, मी फक्त माझ्या मालकाचे ऐकणार,’ असे म्हणत चालकाने तहसीलदार विजय पाटील यांना गाडीजवळ धक्काबुक्की केली. तसेच जबरदस्तीने गाडी पळवून नेण्याचा प्रयत्न केला व ‘माझ्यावर कसलाही गुन्हा दाखल करा, त्यास मी तयार आहे. मी पण तुमच्यावर गुन्हा दाखल करेन. मी कसल्याही परिस्थितीमध्ये ट्रक तहसील कार्यालयात नेणार नाही,’अशी धमकी चालक भरत खराडे याने तहसीलदारांना दिली.
तहसीलदारांना धक्काबुक्की; वाळू माफिया अटकेत..
By admin | Published: May 08, 2016 10:16 PM