पाटण : पाटण तालुक्याचे सर्वात महत्त्वाचे शासकीय अधिकारी आणि विविध खात्यांचे प्रमुख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तहसीलदार रवींद्र माने यांना नेमणूक झाल्यापासून आजअखेर येथील शासकीय विश्रामगृहावर मुक्काम करावा लागत आहे. त्यांच्यासाठी असणारे निवासस्थान वापराअभावी पडून असल्याचे दिसत आहे. त्यामुळे तहसीलदार निवासस्थानाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
तालुक्यातील जनतेच्यादृष्टीने तहसीलदारांचे पद अत्यंत महत्त्वाचे असून, तहसीलदारांना तालुक्यात पूर्णवेळ हजर राहणे बंधनकारक असते. त्यासाठी शासनाने प्रत्येक तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपूर्वी तहसीलदारांसाठी शासकीय निवासस्थाने बांधून ठेवली आहेत. मात्र, ही निवासस्थाने सोयी-सुविधांअभावी आणि अत्यंत अपुºया जागेत तसेच तोकडी बांधकाम असलेली असून, त्यामध्ये राहण्यास अधिकारी नाखूश असतात. पाटणमध्येही हीच स्थिती असून, त्यामुळे यापूर्वीच्या अनेक तहसीलदारांनी स्वत:साठी स्वतंत्र खासगी निवासस्थाने निवडून तेथे राहणे पसंद केले आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी पाटणला नेमणूक झालेले तहसीलदार रवींद्र माने हेदेखील हजर झाल्यापासून आजपर्यंत शासकीय विश्रामगृहात मुक्काम करत असून, त्यांना अद्याप त्यांच्या सोयीचे घर सापडलेले नाही. तसेच पाटणसारखा दुर्गम आणि डोंगराळ तालुका. त्यातच भौतिक सोयीसुविधांची वानवा. शहरीकरण नाही, त्यामुळे वर्ग १ च्या अधिकाऱ्यांना आपल्या कुटुंबासमवेत राहण्यासाठी हव्या तशा रूम मिळत नाहीत. पाटणसारख्या ठिकाणी सर्व सोयी-सुविधांनी युक्त असे निवासस्थान शोधणे कठीण जाते. त्यामुळे बरेचसे अधिकारी क-हाड, सातारा, पुणे येथे राहून पाटण तालुक्याचा कार्यभार ये-जा करून सांभाळतात.
पाटण येथील तहसीलदारांचे शासकीय निवासस्थान हे तहसील कार्यालयालगतच असून, यापूर्वी नेमणुकीस असलेल्या एक-दोन तहसीलदारांनी या निवासस्थानाचा अल्पकाळ वापर केलेला आहे. त्यानंतर हे निवासस्थान आजअखेर कुलूपबंद आहे. त्यामुळे परिसरही बकाल झाला आहे.
न्यायालयीन वादाचाही प्रश्न?पाटण येथील या शासकीय निवासस्थान परिसरात झाडेझुडपे वाढलेली असून, हे निवासस्थान न्यायालयीन वादात अडकल्याचेही समजते. वरिष्ठांनी यामध्ये लक्ष घालून तालुक्याच्या ठिकाणी असणारी तहसीलदार निवासस्थाने अद्ययावत करावीत. तसेच त्याठिकाणी तहसीलदारांना पूर्णवेळ राहणे बंधनकारक करावे, अशी मागणी होत आहे. पाटणच्या तहसीलदारांचे निवासस्थान वापरात येणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाकडून हालचाली व्हाव्यात. तसेच निवासस्थानाचे नूतनीकरण करून अद्ययावत सोयी-सुविधा त्याठिकाणी निर्माण कराव्यात.
पाटणमध्ये असलेले निवासस्थान नादुरुस्त आहे. त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. सध्या त्याठिकाणी मुक्काम करणे गैरसोयीचे आहे. त्यामुळे इतरत्र राहावे लागते. मी येथे रुजू झाल्यापासून विधानसभा निवडणुका, अवकाळी पाऊस आणि पंचनामे आदी कामे वाढल्याने मला शासकीय विश्रामगृहात राहावे लागले. आता मी निवासाची इतरत्र सोय केलेली आहे.- रवींद्र माने, तहसीलदार, पाटण