दहिवडी : खटाव तालुक्यातील चोराडे, मायणी, चितळी तसेच पुसेगाव वडूज रस्त्यावर अनधिकृतपणे ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यात आली आहे. या कामासाठी डांबरीरस्ता बेकायदेशीररित्या उकरून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. स्वतःच्या फायद्यासाठी कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम केले आहे. या कामासाठी कोणत्याही विभागाची परवानगी घेण्यात आली नाही. याबाबत अनेक नागरिकांना तक्रारी करूनदेखील खटाव विभागाचे उपअभियंता शहाजी देसाई व कार्यकारी अभियंता एस. पी. दराडे हे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप राजू मुळीक यांनी केला आहे.
राजू मुळीक म्हणाले, ‘हे काम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याची परवानगी घेणे गरजेचे असते. सार्वजनिक बांधकाम खात्याने दिलेल्या परवानगीमध्ये रस्त्याच्या मध्यभागापासून १५ मीटरच्या बाहेर परवानगी दिलेली आहे. मात्र, या रस्त्याच्यामधून खोदकाम करून केबल टाकली आहे. आम्ही अनेक तक्रारी सार्वजनिक बांधकाम खात्याचे खटाव उपविभागीय देसाई यांच्याकडे केल्या असता संबंधित अधिकाऱ्याने आम्हांस उडवाउडवीची उत्तरे देऊन आपली स्वतःची जबाबदारी ढकलून दिली. तर साताऱ्याचे कार्यकारी अभियंता एस. पी. दराडे यांनादेखील कल्पना दिली असता त्यांनी देखील याकडे दुर्लक्ष केले आहे. नक्की हे काम कोणाचे आहे आणि यामध्ये अधिकारी वर्ग का दुर्लक्ष करीत आहे, हे समोर येणे गरजेचे आहे. परवानगी देणारे अधिकारीच जर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न करीत असतील. तर अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल गुन्हे दाखल करावेत, अन्यथा आम्ही २६ जानेवारीपासून खटाव तालुक्यातील बांधकाम विभागासमोर उपोषणाला बसणार आहे.’
कोट येणार आहे...