निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ करून कृत्रिम दूध तयार केले जात आहे. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाच्या आहारात अविभाज्य घटक असलेल्या दुधात युरिया, पामतेल, मेलामाईन यांसारखे घातक रसायन मिसळून स्वत:चे उखळ पांढरे करण्याचा गोरखधंदा दूध संकलन करणाऱ्यांनी मांडला आहे. भेसळ करणाऱ्यांवर अंकुश ठेवता येईल, यासाठी राज्य सरकारने कायद्यामध्ये बदल करून प्रशासन अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात दूध भेसळ किंवा अन्न भेसळ झाली असेल तर त्याची सर्वस्वी जबाबदारी अन्न भेसळ अधिकाऱ्यांवर निश्चित करावी. शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध उत्पादन घेतात; मात्र जिल्ह्यात खासगी दूध संस्था आणि दूध प्रक्रिया उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ करून पैसे मिळवणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. जिल्ह्यात दररोज लाखो लिटर दुधाचे संकलन होत असताना गत काही वर्षात अन्न भेसळ विभागाने अपवाद वगळता कोणतीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे सर्व काही आलबेल आहे की गोलमाल आहे, हे नक्की सांगता येत नाही. दुधात भेसळ करण्याचे प्रमाण आणि संबंधित प्रशासनाच्या कार्यवाहीकडे पाहता दूध भेसळीचा हा गोरखधंदा प्रशासनाच्या वरदहस्ताने सुरू नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दुधात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना साताराच्या अन्न-औषध प्रशासन कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करेल, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, जिल्हाध्यक्ष सुशांत गोळे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील कोळी, तालुकाध्यक्ष किरण गोडसे, सागर शेळके आदी उपस्थित होते.