सातारा जिल्ह्यात गावकारभाऱ्यांसाठी शुक्रवारी शांततेत मतदान झाले. उमेदवारांच्या डोक्यात केवळ सत्तेची खुर्ची असल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. मात्र साताऱ्यातून फिरत असलेल्या विक्रेत्याला त्याचं काहीच नाही. डोक्यावरून खुर्ची विकण्यासाठी चालला आहे. (छाया : जावेद खान)
०००००००
बिबट्याची दहशत
कुडाळ : जावळी तालुक्यातील कुडाळसह काही गावांमध्ये बिबट्याची दहशत कायम असून, दोन दिवसांपूर्वीच आठ शेळ्यांचा बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे पशुपालकांमध्ये बिबट्याची दहशत कायम असून, एकटे बाहेर पडण्याचे टाळत आहेत.
००००
निकालाचीच चर्चा
सातारा : जिल्ह्यातील ६५२ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी उत्साहात मतदान झाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्ते चांगल्याच तयारीला लागले होते. आता मतदान झाले असल्याने सर्वच नेत्यांना निकालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. कोणाची बाजी लागणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
०००००
स्ट्रॉबेरीचे दर्शन दुर्लभ
सातारा : दरवर्षी सरासरी जानेवारीमध्ये स्ट्रॉबेरी बाजारपेठेत पाहण्यास मिळत असते. मात्र यंदा प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झालेला असल्याने स्ट्रॉबेरीचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. साताऱ्यातील बाजारपेठेतही स्ट्रॉबेरी विक्रीसाठी येत नसल्याने स्ट्रॉबेरी कधी दाखल होणार याकडे लक्ष लागले आहे.
००००००
बाटल्यांचा खच
सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याच्या डोंगरात असलेल्या झाडाझुडपात काही तरुणाई मद्यपान करण्यासाठी जात असते. त्यामुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्या पडलेल्या पाहावयास मिळत असतात. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
०००००००
साइडपट्ट्या खचल्या
सातारा : सातारा-लोणंद रस्त्यावर अनेक ठिकाणी साइडपट्ट्या खचल्या आहेत. त्यामुळे समोरून एखादे वाहन आले तर वाहन खाली कोणी घ्यायचे यावरून वाहनचालकांमध्ये वादावादी घडत आहे. संबंधित विभागाने लक्ष घालून तातडीने रस्त्याच्या साइडपट्ट्या भराव्यात, अशी मागणी होत आहे.
०००००००००
काम सुरू असल्याने संथ वाहतूक
सातारा : सातारा-बारामती मार्गावरील वाठार स्टेशनदरम्यान काही ठिकाणी रस्ता अनेक वर्षांपासून खराब झाला होता. त्यामुळे डांबरीकरणाची मागणी केली जात होती. या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. मात्र या ठिकाणची वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
०००००
काटेरी झुडपे वाढली
खटाव : खटाव तालुक्यातील प्रमुख रस्ते हे मोठे व प्रशस्त आहेत. मात्र ग्रामीण भागांना जोडणारे रस्ते अरुंद आहेत. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काटेरी झुडपे वाढली आहेत. समोरून एखादे मोठे वाहन आले तर दुचाकीस्वारांना साइडला जाण्यासाठी जागाही शिल्लक राहत नाही. वाहने पंक्चर होत आहेत.
०००००००
रोगाचा प्रादुर्भाव
म्हसवड : माण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वातावरणात बदल होत आहे. यामुळे माणसांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण वाढलेेले असतानाच पिकांवरही विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
०००००
ऊस वाहतूक तेजीत
सातारा : सातारा जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांचा गळीत हंगाम तेजीत आहे. त्यामुळे ऊस वाहतूक जोमात सुरू आहे. अनेक ठिकाणी ट्रॅक्टरद्वारेच ऊस वाहतूक केली जात आहे, मात्र संबंधित ट्रॅक्टर व ट्रॉलीला परावर्तित पट्ट्या किंवा लाल कापड लावले जात नाही. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.
००००००
कुस्त्यांचे फड बंद
सातारा : जिल्ह्यात या कालावधीत दरवर्षी अनेक ठिकाणच्या मोठमोठ्या यात्रा असतात. मात्र कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाने यात्रांमधील कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका कुस्त्यांच्या फडाला बसला आहे.
०००
गोलबागेला सजावट
सातारा : साताऱ्यातील राजवाडा परिसरात असलेल्या गोलबागेत सजावट करण्यात आली आहे. तसेच गोलबागेच्या भोवताली डांबरी रस्त्यावर स्वयंचलित परावर्तित लावण्यात आले आहेत. या ठिकाणी रात्री सतत प्रकाश परावर्तित होत असतो.
०००००
भुयारी मार्गात विरुद्ध दिशेनेही वाहतूक
सातारा : साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरचे नुकतेच लोकार्पण झाले आहे. या ठिकाणची वाहतूक साधीसोपी आहे. सर्वच ठिकाणी एकेरी वाहतूक आहे. तरीही महाविद्यालयीन तरुणाई विनाकारण विरुद्ध दिशेने वाहने घेऊन जात असतात. तसेच मध्यभागी आल्यानंतर मोठ्याने ओरडत असतात. त्यामुळे इतर वाहनचालकांचा गोंधळ होत असतो. त्यातूनच अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
०००००००
कचरा ओढ्यात
सातारा : साताऱ्यातील अनेक ओढ्यांच्या कढेला नगरपालिकेने तारेची जाळी बसविण्यात आली आहे. तरीही काही सातारकर जाळीच्या वरून पिशव्या टाकून कचरा ओढ्यात टाकतात. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका वाढत असतो.
००००००००
जुन्याच मार्गाचा वापर
सातारा : साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरचे लोकार्पण झाले असले तरी त्याबाबत राज्य परिवहन महामंडळाला अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. एसटीची वाहतूक नेहमीच्या मार्गानेच सदरबझार मार्गे केली जात आहे. त्यामुळे प्रवाशांना जादा तिकीट दर द्यावे लागत आहे.
००००००
वाहनचालकांमुळे जनावरांचा जीव टांगणीला
सातारा : साताऱ्यातील बहुतांश ठिकाणचे रस्ते प्रशस्त झाले आहेत. त्यामुळे वाहनेही सुसाट धावत आहेत. त्यामुळे रिकामा रस्ता फार काळ पाहण्यास मिळत नाही. याचा फटका मुक्या जनावरांना बसत आहे. त्यांना रस्ताच ओलांडता येत नसल्याने कित्येक तास जनावरे तसेच थांबलेले असतात. तर काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरे बसत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत असतो. याबाबत योग्य ती शिस्त लावण्याची गरज आहे.