सातारा : अलीकडील काळात स्पर्धा वाढली आहे, आव्हाने उभी आहेत. अशावेळी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळा टिकणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे. या आव्हानांच्या स्पर्धेत सातारा जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग राज्यात एक आदर्श म्हणून नावारुपाला आणावा, असे आवाहन पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी केले. येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, शिक्षण समिती सभापती संजय देसाई, कृषी सभापती किरण साबळे-पाटील, समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील, महिला व बालकल्याण सभापती नीलम पाटील-पार्लेकर, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संगिता भागवत, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, उपशिक्षणाधिकारी तानाजी नरळे आदी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीने १२ जणांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. पालकमंत्री शिंदे म्हणाले, गुरुचे स्थान हे मात्या-पित्याबरोबर आहे. आज संस्कृती बदलत असतानाही गुरूला पूर्वीऐवढेच महत्व आहे. स्पर्धेच्या या युगात इंग्रजी शाळा वाढू लागल्या आहेत. त्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या टिकविणे अवघड झाले आहे. त्यातच भांडवलदारांचे ग्रामीण भागातील शिक्षणाकडे लक्ष गेले नाही, हे आपले सुदैव आहे. जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या का कमी झाली याची दुरूस्ती करण्याची गरज आहे. सातारा जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन विद्यार्थींच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे सांगून पालकमंत्री शिंदे म्हणाले, सत्ता व पदापेक्षा आपण काहीतरी वेगळे करून दाखविणे महत्वाचे असते. त्यादृष्टीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी यापुढेही गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्याचे काम करावे.शिक्षण सभापती देसाई म्हणाले, आपण केलेल्या कामाचा आदर्श सर्वांसमोर यावा म्हणून आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येत असतो. आता मिळालेल्या पुरस्कारामुळे शिक्षकांची आणखी जबाबदारी वाढलेली आहे. शिक्षणात सध्या अनेक आव्हाने येऊ लागली आहेत. ती पेलण्याची ताकद विद्यार्थ्यात निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शिक्षकांनी देशाचा भावी आधारस्तंभ असणाऱ्या युवा पीढीला बळकट करण्याची गरज आहे.उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी शिक्षणातून गुणवान विद्यार्थी घडवा. त्याचबरोबर त्यांना चांगला नागरिकही बनवावे, असे आवाहन केले.यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव शिंदे, सुभाष नरळे, संदीप शिंदे, अमित कदम, माण पंचायत समितीचे सभापती श्रीराम पाटील, अॅड. भास्करराव गुंडगे, तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर, जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे...सुनीता देवकर, अंकुश सपकाळ, वैशाली कदम, राहुल हावरे, दत्तात्रय महांगरे, संजय जाधव, सुरज तुपे, धनंजय कुलकर्णी, श्रीरंग जाधव, संजय नांगरे, जयसिंग कदम आणि सचिन यादव.
शिक्षण विभाग राज्यात नावारुपाला आणा
By admin | Published: September 05, 2014 10:16 PM