वाई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून वाई तालुका शिवसेनेच्या संपर्क नेत्यांनी व पदाधिकारी पश्चिम भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या भागाचा दौरा करून आपत्तीग्रस्त लोकांना अन्नधान्याच्या माध्यमातून मदतसुध्दा केली आहे.
त्यावेळी नैसर्गिक आपत्तीसंदर्भात अनेक गोष्टी समोर आल्या असून, त्यांचे योग्य निवारण झाल्यास दरवर्षी भूस्खलनासारखी परिस्थिती ओढावणार नाही. महाराष्ट्रातील सह्याद्री रांगा कोकणसह अर्ध्या महाराष्ट्राचे संरक्षण करण्याचे काम करीत असताना त्याच डोंगररांगा आपल्या काळ बनून उभ्या राहिल्याने वाई पश्चिम भागातील अनेक गावे नामशेष होतायत की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याला मानवाच्या अनेक चुका कारणीभूत असून, यातून काही तरी शिकण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे. या भागात प्रत्येक विभागाने सतर्क राहण्याची गरज आहे. खालील उपाययोजना कराव्यात, अशा आशयाचे लेखी निवेदन शिवसेनेच्यावतीने तहसीलदार रणजित भोसले यांना देण्यात आले आहे.
निवेदनात असेही म्हटले आहे, वाईच्या पश्चिम भागात दरवर्षी लावण्यात येणाऱ्या वणव्यावर १०० टक्के बंदी घाला, त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला कारणीभूत ठरविण्यात येऊन दंड आकारण्यात यावा, या भागात पशुपालन कमी झाले असून, त्यांची सख्या मर्यादित झाल्याने डोंगरातील गवत खाणारी जनावरेच संपल्याने, वाढलेले गवत वणवा लावण्यास प्रवृत्त करते, उघड्या डोंगरावर झाडे मोठ्या प्रमाणात लावण्यात यावीत, शेताच्या बांधावर तणनाशक फवारणी करणे बंद करण्यात यावे, तणनाशकामुळे बांध निर्जीव होऊन शेती वाहून जाण्यास मदत मिळत आहे, या भागातील ओढ्यांवर कमानीचे पूल बांधण्यात यावेत, पाईप टाकल्यास पाण्याबरोबर झाडे-झुडपे वाहून आल्यास पाईपच्या तोंडाशी ती अडकून राहतात व पुलाशेजारील जमिनीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
जांभळी व जोर या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असावे, तसेच प्रत्येक उपकेंद्राला हक्काची रुग्णवाहिका असावी, जेणेकरून एखादी दुर्घटना घडल्यास जीविताला धोका निर्माण होण्यापासून वाचू शकते. वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार व्हावा, अशी मागणी वाई तालुका शिवसेनेने निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे. निवेदनावर तालुकाप्रमुख अनिल शेंडे, उपतालुकाप्रमुख विवेक भोसले, शहरप्रमुख गणेश जाधव, योगेश चंद्रस, किरण खामकर, गौतम यादव, नितीन पानसे, सोमनाथ अवसरे, सुरेश चव्हाण, संतोष पोफळे यांच्या सह्या आहेत.