शासनाने पंधरा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला, तरीही सातारकरांना कसलीही तमा नसल्याचं गेल्या दोन दिवसांत दिसत आहे. पोलीस बंदोबस्त असतानाही अनेक तरुण दुचाकीवरून शहरात फिरत आहेत. कारवाई टाळण्यासाठी पोलीस उभे असलेल्या चौकाला वळसा घालून तरुणाई शहरातून फिरत आहे, तसेच दररोज लागणाऱ्या वस्तू आणण्यासाठी बाधितांचे नातेवाईकही शहरातून फिरत आहेत. कोरोनाची लक्षणे फारशी दिसत नसली, तरी त्यांच्या संपर्कात आल्याने संसर्ग वाढत आहे. त्यामुळेच साखळी तोडण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. ही साखळी तोडण्यासाठी आता तरी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
पहिल्या फेजमध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले होते. परगांवाहून आलेले, तसेच कोरोनाबाधितांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये सक्तीने ठेवले जात होते. यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला काही प्रमाणात यश आले. मात्र, बाधितांची संख्या कमी होऊ लागल्यानंतर हळूहळू त्या सर्व उपाययोजना थंडावत गेल्या. जिल्ह्यातील सद्यपरिस्थिती पाहता, प्रशासनाने पुन्हा त्या सुरू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
सुदैवाने सातारा शहरामध्ये रयत शिक्षण संस्थेसह अनेक शिक्षण संस्थांच्या शाळा इमारती मोठ्या आहेत. प्रत्येक ठिकाणी स्वच्छतागृह, पाणी, वीज यांची चांगली सोय आहे, तर काही महाविद्यालयांमध्ये वसतिगृह असल्याने मुक्कामाची कसलीही अडचण भासू शकणार नाही. शहरातील बहुतांश इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्येही स्वतंत्र स्वच्छतागृह, तसेच मूलभूत सोईसुविधा आहेत. या इमारती जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतल्यास, तेथे फारसे नवीन काही करण्याची गरज नाही. सध्या शाळा-महाविद्यालये बंद आहेत, त्यामुळे या इमारतींचा योग्य कारणासाठी उपयोग होऊ शकतो.
चौकट
नव्या इमारतीचाही होऊ शकतो उपयोग
शहरात असंख्य इमारती बांधकाम व्यावसायिकांनी बांधून ठेवलेल्या आहेत. मात्र, त्यातील फ्लॅट विकले नाहीत, विकले असले, तरी त्यांचा ग्राहकांकडे ताबा दिलेला नाही किंवा इतर कारणाने पडून आहेत, अशा इमारतीही जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतल्यास त्या ठिकाणी विलगीकरणची चांगली सोय होऊ शकते.
हॉटेलही फायदेशीर
काही मंडळींना संस्थात्मक विलगीकरणमध्ये इतर लोकांबरोबर राहणे उचित वाटत नाही. त्यामुळे ते घरातच थांबतात. हॉटेल व्यावसायिकांनी पुढे येऊन छोट्या-छोट्या खोल्यांचे विलगीकरण कक्ष तयार केल्यास सधन कुटुंबातील मंडळी येथे आनंदाने राहतील. येथे संबंधित नागरिकांची सोय होऊ शकते. हॉटेल व्यवसाय होऊ शकतो यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाने समन्वयातून हॉटेल व्यावसायिकांना काही नियम घालून दिल्यास त्याचा उपयोग होऊ शकतो.
फोटो मेल करणार आहे
शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहात संस्थात्मक विलगीकरण याची सोय करण्यात आलेली आहे. (छाया : मुराद पटेल)