साताऱ्यातील प्रत्येक गल्लीमध्ये नगरपालिकेची भाजी मंडई आहे. त्या ठिकाणी विक्रेत्यांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविल्या आहेत. तरीही असंख्य भाजी विक्रेते पदपथावर बसूनच भाजी घ्या भाजी म्हणत आहेत. पादचाऱ्यांना मात्र त्यातून रस्ता काढावा लागत आहे. (छाया : जावेद खान) २५जावेद०५
००००००००००
उकाड्यात वाढ
सातारा : साताऱ्यासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून थंडी गायब झाली आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. घराघरांत आतापासूनच रात्रंदिवस पंखे सुरू ठेवावे लागत आहेत.
०००००
अपघातांमध्ये वाढ
सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण झाल्यापासून वाहनांचा वेग वाढला आहे. त्यातच काही वाहनचालक लेनचा नियम मोडत आहेत. त्यामुळे पाठीमागून येत असलेल्या भरधाव कार चालकांना नियंत्रण राखणे अवघड जात आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
०००००
जिलेबीचे स्टॉल उभारले
सातारा : साताऱ्यात स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिनाला जिलेबी वाटप करण्याची परंपरा आहे. अनेक वर्षांपासून ती जपली जात आहे. कोरोनाचे सावट असले तरी साताऱ्यातील अनेक मिठाई व्यावसायिकांनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासूनच स्टॉल उभारण्यास सुरुवात केली आहे.
०००००००००
उत्तेश्वर यात्रा साधी
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील वाळणे येथील उत्तेश्वराची रात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. यावेळी भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन यात्रा आयोजन समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
००००००
कूपनलिका बंद
म्हसवड : माण तालुक्यातील अनेक गावांमध्ये उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यंदा चांगला पाऊस झालेला आहे. त्यामुळे चिंता कमी आहे. तरीही बहुसंख्य कूपनलिका बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने दुरुस्त करण्याची गरज आहे.
०००००००
सांस्कृतिक कार्यक्रमांविना प्रजासत्ताक दिन
सातारा : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यानिमित्ताने सुप्त कलागुणांना वाव मिळत असल्याने अनेक मुलं-मुली उत्साहाने यामध्ये सहभागी होत असतात. यंदा मात्र कोरोनाचा धोका असल्याने हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात येणार असून, साध्या पद्धतीने कार्यक्रम होणार आहेत.
०००
घाटात वाहनांच्या रांगा
महाबळेश्वर : शनिवार, रविवार सलग साप्ताहिक सुट्या व मंगळवारी प्रजासत्ताक दिन आला आहे. त्यामुळे महाबळेश्वर, पाचगणी परिसरात पुन्हा पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे पाचगणी-महाबळेश्वर मार्गावरील घाटात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक ठप्प झाली होती.
००००००
आज सायकल रॅली
सातारा : सातारा नगरपालिकेच्या अरोग्य विभागातर्फे स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत जनजागृती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून प्रजासत्ताक दिनी आज, मंगळवारी पर्यावरणपूरक सायकल रॅली आयोजित केली आहे. यामध्ये असंख्य सातारकर सहभागी होतील.
००००००
मास्क खरेदीसाठी गर्दी
सातारा : जिल्ह्यातील पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग बुधवार (दि. २७) पासून सुरू होत आहेत. त्यामुळे मुलं शाळेत जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून असंख्य पालक, मुलांसाठी मास्क, हॅण्डग्लोज, सॅनिटायझर खरेदी करण्यात मग्न आहेत. त्यासाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे.
०००००००
कुत्र्यांमुळे दहशत
पेट्री : सातारा तालुक्यातील काही भागात कुत्र्यांची टोळकी मोठ्या प्रमाणावर वावरत असतात. त्यांच्याकडून माणसांवर हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
००००००००००
बटाट्याचे दर स्वस्त
सातारा : साताऱ्यातील महात्मा फुले भाजी मंडईत रविवारी झालेल्या आठवडा बाजारात बटाट्याचे दर कमी झाल्याचे अनुभवास मिळाले. त्यामुळे बटाटे तीस रुपयांना दोन किलो मिळत होते. साहजिकच बटाटे खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती.
०००००००
दप्तर, गणवेश खरेदीसाठी पालकांची गर्दी
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात पाचवी ते नववीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. गेल्या मार्च महिन्यापासून मुलं शाळेत गेले नाहीत. त्यांना गणवेश, दप्तर, शूजही खरेदी केलेले नाहीत. आता शाळा सुरू होणार असल्याने गणवेश खरेदी करण्यासाठी काही पालकांची या परिसरात गर्दी होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी जाणवत आहे.
००००००
एकेरीतून वाहतूक
सातारा : साताऱ्यातील पाचशे एक पाटी ते मोती चौकातून राजवाड्याकडून पोवई नाक्याकडे जाता येते; पण राजवाड्याकडे जाता येत नाही. तरीही अनेक दुचाकीस्वार या मार्गात एकेरीतून वाहने चालवीत असतात. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
०००००००
बाजारात चोरीत वाढ
सातारा : साताऱ्यात जुन्या मोटार स्टॅण्ड परिसरात मोठ्या प्रमाणावर आठवडा बाजार भरत असतो. यासाठी ग्रामीण भागातून नागरिक मोठ्या संख्येने येतात. या गर्दीचा फायदा घेऊन काहीजण मोबाईल चोरी करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
०००००००
महामार्गावर हेल्मेट सक्ती करण्याची गरज
सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण झाल्यापासून वाहनांचा वेग वाढला आहे. त्यामुळे वाहतुकीचा अंदाज न आल्याने अपघातांचा वेग वाढला आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. यापासून बचाव करण्यासाठी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्याची सक्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. जे दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करणार नाहीत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
०००००००००००