कोरेगाव : जमीन वाटपाचे आदेश तहसीलदार कोरेगाव यांच्याकडून करून देण्यासाठी अंबवडे (सं.) कोरेगाव गावचे तलाठी राजू गजानन इंगळे (वय ३०, रा. सज्जनपुरा कोेरेगाव, मूळ रा. सिल्लोड, जि. औरंगाबाद) याला ३५ हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे पडताळणी कारवाईमध्ये सिद्ध झाल्याने त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.याबाबत कोरेगाव पोलीस ठाण्यात तलाठी राजू इंगळेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांची जमीन वाटपाचे आदेश तहसीलदार कोरेगाव यांच्याकडून करून देण्यासाठी अंबवडे (सं.) कोरेगावचे तलाठी राजू इंगळे याने तक्रारदार यांच्याकडून ३५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
यासंदर्भात तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार या विभागाने या तक्रारीबाबत पडताळणी केली असता पडताळणी कारवाईमध्ये तलाठी राजू इंगळेने लाचेची मागणी तहसील कार्यालय कोरेगावच्या आवारात केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला ताब्यात घेऊन कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप चव्हाण, पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरिफा मुल्ला, सहायक फौजदार आनंदराव सपकाळ, भरत शिंदे, संजय साळुंखे, विजय काटवटे, अजित कर्णे, प्रशांत ताटे, संजय अडसूळ, संभाजी काटकर, विशाल खरात, नीलेश येवले, नीलेश वायदंडे, तुषार भोसले, शीतल सपकाळ यांनी केली.