आदर्की,28 : हिंगणगाव, ता. फलटण येथील कार्यालयात तलाठी उपस्थित राहत नसल्याने शेतकरी, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करूनही दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी तलाठी कार्यालयासच टाळे ठोकले. यावेळी आठ दिवसात नविन तलाठी गावासाठी न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
हिंगणगाव, ता. फलटण येथे दोन वर्षांपासून एस. ए. काकडे यांची गाव कामगार तलाठी म्हणून नेमणूक आहे. पण, तलाठी काहीवेळाच हजर होतात.
ग्रामसभेलाही उपस्थित राहत नसल्याने त्यांचा बदलीचा ठराव वांरवार घेण्यात आला आहे. तरीही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. तलाठी गैरहजर राहत असल्याने शेतकरी, विद्यार्थ्यांना सातबारा आणि विविध दाखल्यांसाठी फलटण यथे जावे लागते. परिणामी वेळ आणि पैसा वाया घालवावा लागत आहे. दरम्यान, याबाबत जिल्हाधिकारी तसेच तहसीलदारांनी लक्ष न दिल्याने ग्रामस्थांनी तलाठी कार्यालयास टाळे ठोकले.
यावेळी सरपंच मारूती खुडे, श्रीराम साखर कारखान्याचे संचालक डॉ. पद्मराज भोईटे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अजित भोईटे, जयदिप ढमाळ, कृष्णात भोईटे, नवनाथ शिंदे, नरसिंग ठोंबरे, श्रीकांत भोईटे, विश्वासराव भोईटे, गणेश भोईटे, माणिकराव भोईटे, पांडुरंग ढमाळ, विशाल भोईटे, प्रमोद काटकर, सुनील भोईटे आदी उपस्थित होते. गत दोन वर्षांत तलाठी काकडे हे वारंवार गैरहजर राहिले आहेत. यामुळे ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थ्यांना दाखले व शासकीय कामासाठी अडचणी येत आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त सामितीचे तलाठी हे सचिव आहेत. ते गैरहजर राहिल्याने मिटिंग होत नाही. - अजित भोईटे,अध्यक्ष तंटामुक्त समिती