कऱ्हाड : महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे १८ वे राज्यस्तरीय अधिवेशन येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाच्या प्रांगणात शनिवारी सुरू झाले. पहिल्याच दिवशी राज्यभरातून सुमारे अडीच हजारांहून तलाठी कऱ्हाडनगरीत दाखल झाले आहेत. दुपारी झालेल्या कार्यकारणीच्या बैठकीत नव्या अध्यक्षांच्या निवडीवर चर्चा होऊन कऱ्हाडचे सुपुत्र ज्ञानदेव डुबल यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. तब्बल अठरा वर्षानंतर कऱ्हाडला दुसऱ्यांदा संधी मिळण्याची सांगितले जात आहे. कृष्णा-कोयनेचा प्रीतिसंगम असणाऱ्या दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या कऱ्हाडनगरीत अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यातील तलाठ्यांचा संगम झाल्याचे पाहायला मिळते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग मदने, सरचिटणीस भालचंद्र भादुले, कऱ्हाड तालुका अध्यक्ष चंद्रकांत पारवे यांच्यासह संयोजन कमिटीने अधिवेशनाचे नेटके नियोजन केले आहे. सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. दिवंगत बी. डी. चव्हाण यांनी महाराष्ट्रभर तलाठी संघटना मजबूत करण्यासाठी योगदान दिले. १९८० पासून १९९४ पर्यंत त्यांनी राज्यभर फिरून तलाठ्यांचे प्रश्न जाणून घेतले आणि त्यांना संघटित करून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी) कऱ्हाडला पहिल्यांदाच संधी कऱ्हाडला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशी मोठी परंपरा आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलन, नाट्य संमलेन व बालकुमार साहित्य संमेलन यांच्यासह विविध राज्यस्तरीय अधिवेशने कऱ्हाडकरांनी यशस्वी करून दाखविली आहेत. म्हणूनच की काय एका तालुक्याच्या ठिकाणी तलाठी संघटनेचेही राज्यस्तरीय अधिवेशन कऱ्हाडला होत आहे. मात्र, त्याचे नेटके नियोजनही संयोजनकांनी केल्याचे पाहायला मिळत आहे. सात हजार तलाठ्यांची उपस्थिती! या अधिवेशनासाठी पहिल्याच दिवशी राज्यभरातून अडीच हजार तलाठी दाखल झाले असले तरी रविवारी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मुख्य कार्यक्रमासाठी राज्यभरातून सात हजारांवर तलाठी उपस्थित राहतील, असा विश्वास संयोजक व्यक्त करीत आहेत. सरचिटणीसपदी तुपेंची वर्णी शक्य तलाठी संघटनेच्या बैठकीत औरंगाबादचे सतीश तुपे यांची राजय सरचिटणीसपदी निवड करण्याबाबतही चर्चा झाली. त्यालाही सर्वांनीच सहमती दर्शविल्याने सरचिटणीसपदी त्यांचीच वर्णी लागणार असल्याची शक्यता आहे.
तलाठी संघटना राज्याध्यक्षपदी डुबल
By admin | Published: January 17, 2016 12:01 AM