आॅनलाईन लोकमतखंडाळा (जि. सातारा), दि. 0७ : खंडाळा तालुक्यात सात बारा संगणकीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. यासाठी सर्वच गावांचे तलाठी तहसील कार्यालयात अडकून पडले आहेत. त्यामुळे तलाठ्यांअभावी गावपातळीवरील कामे ठप्प आहेत. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींमुळे सध्या तलाठी आहेत का ? अशी म्हणण्याची वेळ गावोगावच्या ग्रामस्थांवर आली आहे. महसूल विभागाच्या या अनागोंदी कारभाराने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
सातबारा संगणकीकरणाचे काम तालुक्यात सर्वत्र सुरु असल्याने गावातून तलाठी गायब आहेत. त्यामुळे सातबारा काढणे, वारस नोंदी करणे यासह अनेक कामांसाठी तलाठी कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. विशेष म्हणजे या संगणकीकृत सातबारामध्ये अनेक त्रुटी आढळून येत आहेत. जमीन खरेदी विक्री करण्यासाठी संगणकीय सातबाराच ग्राह्य धरला जात आहे. मात्र, त्यामध्ये त्रुटी असल्याने त्या दूर करण्यासाठी स्टँम्प व्हेंडरना त्रास घ्यावा लागत आहे. यासाठी तलाठ्यांची मनधरणी करावी लागत आहे. याचा आर्थिक भूर्दंड मात्र शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. तरीही हा खेळ राजरोसपणे सुरुच आहे.
आठवड्यातून चार-चार दिवस गावात तलाठ्यांचे दर्शन नसल्याने तलाठी कार्यालयातील छोट्या कामांसाठी लोकांना तहसील कार्यालयात हेलपाटे घालावे लागत आहेत. तरीही आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण नसल्याने शेतकऱ्यांना सातबारा मिळणे जिकरीचेच होत आहे.प्रत्येक गावात तलाठ्यांना कार्यालयात बसण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे लोकांची कामे खोळंबली आहेत. तलाठ्यांना शोधत तालुक्यापर्यंत जावे लागत आहे. तरीही लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. तलाठ्यांनी संगणकीकरणाच्या कामाबरोबरच गावातील कार्यालयातही वेळ द्यावा ही सर्वांची अपेक्षा आहे.
- राजेंद्र भोसले,
उपसरपंच, शिवाजीनगर