महाबळेश्वर : ‘येथील ग्रामीण रुग्णालयात पालिकेच्या वतीने कोरोना केअर सेंटर सुरू करण्यासाठी पालिकेने प्रथम त्यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. तोपर्यंत कोरोना रुग्णांसाठी तळदेव व बेल एअर येथे प्रत्येकी २० ऑक्सिजन सुविधा असलेले बेड तातडीने वाढविण्यात येतील,’ अशी माहिती आमदार मकरंद पाटील यांनी रविवारी दिली.
महाबळेश्वर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार मकरंद पाटील यांनी येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, सभापती संजय गायकवाड, गटविकास अधिकारी नारायण घोलप, तालुका आरोग्याधिकारी डॉ. अजित कदम, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, बेल एअरचे फादर टॉमी उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, ग्रामीण रुग्णालयाची इमारत मोठी आहे; परंतु कोरोना रुग्णांसाठी येथे रुग्णालय सुरू केले तर अधिक बेडची सुविधा करता येणार नाही. साधारण २० बेडचे रुग्णालय सुरू करता येऊ शकते; परंतु त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर व नर्स यांची सोय करणे कठीण काम आहे. रुग्णालय सुरू करता येईल; परंतु ते चालविणे कठीण काम असते. पायाभूत सुविधांसाठी पालिकेने खर्च करावा. आमदार निधीतून दहा ते पंधरा लाख रुपयांची सोय करतो. पालिकेने प्रथम कर्मचाऱ्यांची सोय करावी. कोरोना रुग्णालय हे फार मोठ्या जबाबदारी व जोखमीचे काम आहे. या ठिकाणी हलगर्जीपणा झाला, थोडी चूक झाली आणि एखादी अप्रिय घटना घडली तर महागात पडेल. या बाबींचा विचार करून पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा.’
‘नगराध्यक्षांनी महाबळेश्वर येथे पालिकेच्या वतीने शंभर बेडची सुविधा असणारे कोरोना रुग्णालय सुरू करण्याची घोषणा केली आहे,’ अशी माहिती उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी दिली. यावर पाटील म्हणाले, ‘गंमत म्हणून घोषणा करणे सोपे आहे; परंतु त्यासाठी लागणारी परवानगी मिळणार आहे का? मिळाली तर त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर मिळणार आहेत का? खासगी मिळकतीमध्ये शासनाचा पैसा खर्च करता येईल का? शंभर बेडच्या रुग्णालयाचा खर्च पालिकेला झेपणार आहे का? हे पाहावे. ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांची सोय होईपर्यंत तळदेव व बेल एअर येथे प्रत्येकी २० बेड वाढवावेत.’
तालुका आरोग्याधिकारी डॉ. अजित कदम यांनी तालुक्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. बैठकीला पालिकेतील राष्ट्रवादी व शिवसेनेचे नगरसेवक, दत्ताजी वाडकर, रोहित ढेबे, संदीप मोरे, जीवन महाबळेश्वरकर, शहरातील सर्व डॉक्टर उपस्थित होते.