सातारा : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे घडलेल्या अत्याचारानंतर संपूर्ण समाजमन हेलावून गेले आहे. समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हाच धागा पकडून साताऱ्यातील असंख्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे देखावे महिलांच्या सुरक्षेवर बोलू लागले आहेत. महिलांकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना शिवरायांनी केलेल्या शिक्षांचा दाखला देण्यात येऊ लागला आहे.गौरीच्या विसर्जनानंतर साताऱ्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखावे पाहण्यासाठी खुले केले आहेत. यामध्ये हालते देखावे, जिवंत देखावे सादर केले आहेत. त्यातून जलशिवार अभियान, पाणीटंचाई, महिला सुरक्षा, देशभक्तीपर देखावे सादर करून सामाजिक विषयांना हात घातले आहेत.गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी सौरऊर्जा, पवनचक्की, गेल्यावर्षी ‘बेटी बचाव-बेटी पढाव’ या विषयांवर देखावे सादर केले जात होते. यंदा महिलांची सुरक्षा, अत्याचार, छेडछाड या विषयांवर देखावे सादर होऊ लागले आहेत.माण, खटाव तालुक्यातील गावे दुष्काळाने होरपळत आहेत. या विषयावरही अनेकांनी देखावे सादर केले आहेत. साताऱ्यातील पोवई नाका येथील शिवाजी गणेशोत्सव मंडळाने यंदा ‘शंभूमहादेवांची लगीन वरात’ हा हालता देखावा सादर केला आहे. या वरातीतील देवतांबरोबरच राक्षस, भुतांच्याही प्रतिकृती असल्याने लहान मुले अचंबित होत आहेत.गौरीला घरोघरीही देखावे सादर करण्यात आले होते. यामध्ये जलयुक्त शिवारच्या कामांवर देखावे तयार केले आहेत. पाणी वाचविण्यासाठी, पाणी अडविणे गरजेचे आहे. यावर महिलांनी देखाव्यातून उपाय सुचविले आहेत. तर काहींनी झाडे लावा, झाडे जगवायचा संदेश देखाव्यातून दिला आहे. हे देखावेही सातारकरांना आंतरमुख करायला लावत आहेत. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या सुरक्षेसाठीही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी खबरदारी घेतली आहे. (प्रतिनिधी) ऐतिहासिक देखाव्यांवर भर...साताऱ्यातील अनेक मंडळांनी ऐतिहासिक देखावे तयार केले आहेत. त्यामुळे देखावे पाहताना जनू इतिहासच डोळ्यासमोरून जात असल्याचे भासते. कलाकारांनी केलेली वेशभूषा, रस्त्यावरील ऐतिहासिक कमानी, गड आणि ध्वनी यामुळे ऐतिहासिक देखावे पाहताना वेगळाच फील येत असतो. यामध्ये राजपथावरील मारवाडी भुवन छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान, शनिवार पेठेतील राजकमल गजाननोत्सव मंडळाने स्वराज्य ते सुराज्य, सोमवार पेठेतील गजराज गणेशोत्सव मंडळाने ‘गड आला पण सिंह गेला’ या विषयावर देखावा तयार केला आहे. गर्दीतच दुचाकींची घुसखोरीसायंकाळी सातनंतर देखावे पाहण्यासाठी खुले होतात. घरातील कामे उरकून सहकुटुंब, बायका-मुलं, वृद्धांना घेऊन लोक देखावे पाहण्यासाठी येत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर गर्दी होत आहे. दुचाकीवरून येणारे गाड्या लांब लावून चालत जाण्याऐवजी गाडी घेऊनच फिरत असल्याने वृद्धांचे हाल होत आहेत. त्यामुळे वाहनांसाठी राजवाडा, जुना मोटार स्टॅण्ड परिसरात पार्किंगची सोय करण्याची मागणी होत आहे.चार मंडळांकडून महिलांवर विषय...महिला अत्याचाराच्या घटनांवर अनेकांना भरभरून बोलायचे आहे. त्यामुळे शनिवार पेठेतील बालविकास मंडळ, सोमवार पेठेतील अजिंक्य गणेशोत्सव मंडळाने बेटी बचाव, बेटी पढाव. सोमवार पेठेतील फुटका तलाव गणेशोत्सव मंडळ, भोई गल्लीतील विजय मंडळांनी महिलांवरील अत्याचार हा विषय हाताळला आहे. या देखाव्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेसार्वजनिक गणेशोत्सव मंडळात देखावे पाहण्यासाठी येणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी साताऱ्यातील अनेक मंडळांनी खबरदारी घेतली आहेत. अनेकांनी स्वागत कमानीपासून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा तयार केल्या आहेत.
महिलांच्या सुरक्षेवर बोलू लागले देखावे!
By admin | Published: September 13, 2016 12:17 AM