वडूज : ‘या भागाचा दुष्काळी कलंक पुसण्यासाठी खटाव-माण तालुक्यांतील औद्योगिक धोरण गतीने राबविणे काळाची गरज असून, सुरू असलेल्या औद्योगिक प्रकल्पांमुळेच खटाव-माण तालुक्यांची भरभराटी होईल,’ असा ठाम विश्वास पालकमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केला. पिंगळी, ता. माण येथील माणदेशी प्रबोधनकार मागासवर्गीय सह. सूतगिरणीच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख, माजी सभापती धर्मराज जगदाळे, सुभाष जगदाळे, मोहन जगदाळे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पवार, युवराज जगदाळे, यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री शिवतारे म्हणाले, ‘माण-खटाव या दोन्ही तालुक्यांचा भौगोलिक अभ्यास करून रणजितसिंह देशमुख या युवकाने औद्योगिक क्रांती घडवली आहे. अत्याधुनिक मशनरी असलेली ही सूतगिरणी राज्याला आदर्श ठरणार असून, येथील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव व रोजगार उपलब्ध होणार आहे.’ रणजितसिंह देशमुख म्हणाले, ‘जिल्ह्याला लाभलेले पालकमंत्री यांच्याकडे पूर्णपणे विकासाचा दृष्टिकोन असल्यानेच खटाव-माण तालुक्यांतील सिंचन योजना मार्गी लागून औद्योगिक प्रकल्पांना नवे बळ मिळणार आहे. शिवसेना-भाजप युतीच्या काळातच या दोन्ही प्रकल्पांना मान्यता मिळून हे दोन्ही प्रकल्प कार्यान्वित झाल्याचे समाधान आपणास आहे. पूर्णपणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रतिदिन १५ टन उत्पादन निघते.’ यावेळी जनरल मॅनेजर सयाजी सुर्वे, टेक्निकल जनरल मॅनेजर हर्षल देशपांडे, चीफ अकौउंटंट हणमंत सावंत, इलेक्ट्रिक इंजिनिअर संतोष कदम उपस्थित होते. (प्रतिनिधी)
औद्योगिक प्रकल्पांमुळेच तालुक्याची भरभराटी होईल : विजय शिवतारे
By admin | Published: February 11, 2015 9:26 PM