साताऱ्यातील भरबाजारपेठेत वीज वितरण कंपनी, दूरध्वनी विभागाचे खांब आहेत. त्यातील काही खांबांवरील पेटीला दरवाजाही नाही. त्यामुळे वायरींचे जंजाळ उघडे झाले आहे. (छाया : जावेद खान) फोटो२०जावेद०६
----------------------------------
शहरातील रस्ते ओस
सातारा : कोरोनाचा शिरकाव इतर जिल्ह्यांत वाढत असल्याने जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. ही माहिती सोशल मीडियातून सोमवारी रात्रीच सातारकरांना समजली. त्यानंतर शहरातील रस्ते ओस पडले होते. रात्री अकराच्या सुमारास शुकशुकाट जाणवत होता.
---------------------------------पटसंख्या कमी
सातारा : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. काही शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून जाणवत आहे. त्याचप्रमाणे काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या खेळाचे सराव सुरू केले आहेत. मात्र, पालकही पाठवण्यास तयार नाहीत.
--------------------------------
पाणीपातळी घटली
सातारा : सातारा जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे अजूनही धरणांंमधील पाणीसाठा शिल्लक असला तरी ग्रामीण भागातील भू-जलपातळी घटत चालली आहे. अनेक कुपनलिकांचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.
--------------------------------कारवाईचा सपाटा
सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी अनेक जण मास्कचा नियमित वापर करीत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा मुकाबला करणे अवघड जाणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन चिंतेत असून, विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा सपाटा लावला आहे.
-----------------------------------पंख्यांचा वापर वाढला
सातारा : जिल्ह्यात उकाड्यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कार्यालये, दुकाने, बँका, घरांमध्ये उकाड्यापासून बचाव करण्यासाठी पंख्यांचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे, तर काही ठिकाणी शेतात दुपारी झाडाखाली झोपायला जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
------------------------------विद्युतपुरवठा दिवसभर खंडित
सातारा : साताऱ्यातील मंगळवार पेठ, मोरे कॉलनी, व्यंकटपुरा पेठेत सोमवारी सकाळी दहा वाजेपासून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. वीज कंपनीकडून शक्यतो आदल्या दिवशीच ग्राहकांना कल्पना दिली जाते. मात्र, रविवारी अशी सूचना मिळाली नव्हती. याबाबत कोणी विचारणा केली तर दोन तासांनी येईल, असे मोघम उत्तर दिले जात होते.
-----------------------------वातानुकूलित यंत्रे बंद
सातारा : देशभरात गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. तेव्हा कोरोनाचे विषाणू थंड वातावरणात जास्त काळ जिवंत राहतात, त्यामुळे वातानुकुलित यंत्रणांचा वापर न करण्याचे आवाहन केले जात होते. तेव्हापासून बँका, तसेच घरांमधील यंत्रणा बंद अवस्थेत आहेत.
--------------------------------साइड पट्टी भरा
बामणोली : कास-बामणोली रस्त्यावर घाटाई फाटा ते कास गावापर्यंत रस्त्याची खूपच दुरवस्था झाली आहे. हा रस्ता अरुंद, तसेच नागमोडी वळणाचा असल्याने एकाच वेळी समोरासमोर दोन मोठी वाहने आली तर रस्ता पार करणे अवघड बनते. त्यामुळे साइडपट्ट्या भरण्याची मागणी करण्यात येत आहे.
-----------------------------------मेथीची भाजी स्वस्त
सातारा : सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती, तसेच साताऱ्यात ग्रामीण भागात मेथीची आवक वाढली आहे. त्यामुळे मेथीचे दरही आवाक्यात आले आहेत. सरासरी दहा रुपयांना दोन मोठमोठ्या जुड्या मिळत आहेत. त्यामुळे सातारकरांमधून मेथीला मागणी वाढत आहे. त्यातून शेतकऱ्यांनाही चार पैसे मिळत आहेत.
----------------------------------बेकार भत्त्याची मागणी
सातारा : कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून अनेक उद्योग बंद होते. त्यामुळे अनेकांना घरात बसावे लागले होते. कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असल्याने ही परिस्थिती पुन्हा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बेकार भत्ता सुरू करावा, अशी मागणी होत आहे.
----------------------------------वाचनालये ओस
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने वाचनालये बंद अवस्थेत होते. त्यानंतर ते सुरू झाल्यानंतर तरुणाई वाचनालयात जात होती. मात्र, आता शाळा-महाविद्यालये सुरू झाल्याने वाचनालये ओस पडल्याचे जाणवत आहे. रविवारी गर्दी जाणवत आहे.
--------------------------------
कृष्णा-वेण्णा उत्सव साध्या पद्धतीने साजरा
सातारा : साताऱ्यातील संगममाहुली येथे दरवर्षी साजरा होणारा कृष्णा-वेण्णा उत्सह यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. हा उत्सव कमीत कमी माणसांच्या उपस्थितीत व मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती कृष्णा-वेण्णा उत्सव संस्थेचे विश्वस्त नंदकुमार कुलकर्णी यांनी दिली.
-------------------------------खेळाबाबत मुले पेचात
नागठाणे : अनेक शाळांनी खेळाचे सराव सुरू केले आहेत. मुलांनाही याठिकाणी जायचे आहे. मात्र, कोरोनाचा शिरकाव वाढत असल्याने पालक मुलांना पाठविण्यास तयार नाहीत. त्यामुळं मुलं पेचात सापडली आहेत. पालकांना विरोध करू शकत नाही अन् सराव थांबायला नको वाटत आहे.
-----------------------------------
रस्त्यावर पेंटिंग
सातारा : साताऱ्यातील अनेक रस्त्यांना बकाल अवस्था आली आहे. त्यामुळे काही हौसी चित्रकारांनी रस्त्यांकडेच्या भिंतींवर रंगरंगोटी केली आहे, तसेच काही ठिकाणी आकर्षक चित्रे, व्यंगचित्रे, जनजागृती करणाऱ्या म्हणी लिहिल्या आहेत.
-------------------------------
बाटलीभर पेट्रोल कधी संपलं कळतच नाही
सातारा : पेट्रोल, डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. सरासरी शंभर रुपयांना एक बाटली पेट्रोल येते. ते दोन दिवसही पुरत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. अगोदरच महागायीने कंबरडे मोडले असताना डिझेलच्या दरवाढीमुळे मंडईतील कांदा, बटाट्यासह पालेभाज्यांचा दरही वाढत आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर कधी कमी होणार, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.