मायणी : खटाव तालुक्यामध्ये यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असून, सर्वत्र अद्यापही बऱ्यापैकी पाणीसाठा असल्याने निम्मा मार्च महिना संपला तरी एकाही गावातून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल नाही.
गेली कित्येक वर्षांपासून जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच खटाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यामुळे अनेक गावांतील ग्रामपंचायतींमार्फत गावाला पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी शासनाकडे टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव दिला जातो. यावर्षी खटाव तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला तसेच तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये जलसंधारणाबरोबरच लोकसहभाग व सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे मार्गी लागली. अनेक लहान-मोठ्या ओढ्यांवर, नाल्यांवर सिमेंट बांध, मातीबांध बांधण्यात आल्याने यामध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साठे, याचा परिणाम जमिनीतील पाणी पातळीही वाढ झाली.
त्यामुळे यावर्षी निम्मा मार्च होत आला तरीही तालुक्यातील कोणत्याही गावाकडून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची मागणी शासनाकडे केली नाही. गावामध्ये बऱ्यापैकी पाणी उपलब्ध असल्याने ही खरोखरच खटाव तालुक्यातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाचा परिणाम आहे.
चौकट-
..तर टँकरची गरज भासणार नाही...
तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी व शेती पाहण्यासाठी असणाऱ्या विविध उपसा सिंचन योजना यामध्ये उरमोडी, जिहे-कठापूर, तारळी टेंभू योजनेचे पाणी तालुक्यामध्ये तयार असलेल्या पाटांना व पोटपाटांना सोडल्यास सर्वत्र पाणीसाठा निर्माण होऊन जमिनीतील पाणीपातळी वाढेल व टँकरची गरज भासणार नाही त्यामुळे शासनाचा अतिरिक्त टँकरवर होणारा खर्चही वाचू शकतो.
कोट..
प्रतिवर्षी जानेवारी महिन्यातच तालुक्यातील १० ते १२ गावांचा तसेच फेब्रुवारी, मार्च, एप्रिल अखेर शंभरच्या आसपास गावांचा प्रस्ताव टँकर सुरू करण्यासाठी येत असतो; मात्र यावर्षी आजअखेर एकही प्रस्ताव आला नाही.
-शंकर झेंडे, पाणीपुरवठा विभाग, खटाव तालुका