मेढा : महाडहून साताऱ्याकडे निघालेला टँकर केळघर घाटातील काळ्या कड्याच्या वरच्या बाजूला असलेल्या तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने सुमारे सहाशे फूट दरीत कोसळला. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात वेळेत दाखल केल्याने जीव वाचला. हा अपघात शनिवारी पहाटेच्या सुमारास झाला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मळीची वाहतूक करणारा टँकर (एमएच१२ ईएफ ३६९७) महाडवरून साताऱ्याला येत होता. पहाटेच्या सुमारास केळघर घाटात आल्यानंतर तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने टँकर सहाशे फूट दरीत कोसळला. या अपघातात टँकरचालक राजमहंमद इनामदार (वय ४०, रा. विजापूर तुबगी) गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी या अपघाताची माहिती मेढा पोलिसांना दिली. त्यानंतर साहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी तत्काळ पोहोचले. पोलिसांनी महाबळेश्वर येथील सह्याद्री ट्रेकर्सचे संजय पारटे, अक्षय शेलार, विजय केळगणे, प्रशांत घाटगे आणि मोकवली ग्रामस्थांना मदतीसाठी बोलावून घेतले. या सर्वांबरोबर पोलीसही सहाशे फूट दरीत उतरले. टँकरचालकाला रक्तबंबाळ अवस्थेत दरीतून वर काढले. त्यानंतर तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे चालकाचा जीव वाचला. साहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान चवरे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या या प्रसंगावधानाचे जावळीकरांमधून समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
टॅँकर सहाशे फूट दरीत कोसळला
By admin | Published: December 26, 2015 11:59 PM