सातारा : मराठा आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आज, गुरुवारी शहरात ट्रँक्टर रँली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो शेतकरी ट्रँक्टरसह सहभागी झाले आहेत. बॉम्बे रेस्टॉरंट, जिल्हा परिषद, गोडोली, पोवई नाका, नगरपालिका, राजवाडा, खनआळी, पोलिस मुख्यालय, शिवतीर्थ ते आंदोलन स्थळ असा रॅलीचा मार्ग असणार आहे.
दरम्यानच, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सुरु असलेल्या साखळी उपोषणातील एका आंदोलनकर्त्याची प्रकृती खालावली. प्रकाश भोसले असे आंदोनकर्त्यांचे नाव असून, त्यांच्यावर उपोषणस्थळीच उपचार करण्यात आले.मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, सातारा जिल्ह्यातही या आंदोलनाची धग कायम आहे. विविध संघटनांचा या आंदोलनाचा पाठिंबा वाढत चालला असून, साडेपाचशेहून अधिक गावांत नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी दि.३१ ऑक्टोबरला जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर काल, बुधवारी (दि.१) जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली होती.