तरडगाव : तरडगाव (ता. फलटण) येथील एकाच ठिकाणचे २२ जणांचे अहवाल बुधवारी कोरोनाबाधित आल्याने गावात कोरोनाच्या संख्येने शंभरी ओलांडली असून, बाधितांची संख्या ११३ इतकी झाली आहे. तर इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने गावासह परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुधवारी आलेल्या तपासणी अहवालात एकूण २२ जणांचे अहवाल कोरोनाबाधित आल्याचे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कदम यांनी सांगितले. त्यातील १० व्यक्तींना उपचारार्थ फलटणला पाठविले असून, इतरांना आश्रम परिसरात इतर ठिकाणी होम क्वारंटाइन केले आहे. आरोग्य विभागाकडून आरोग्य तपासणीबाबत दक्षता घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
गावातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी योग्य खबरदारी घेणे आवश्यक बनले आहे, तसेच विविध विभागांतील पदाधिकाऱ्यांनी सतर्क राहून उद्भवलेल्या संकटांना सामोरे जाताना अजून कोणत्या उपाययोजना आखल्या पाहिजेत हे चर्चेतून सुचवून कृतीत आणणे तसेच नियमांचे उल्लंघन न होता नागरिकांना जीवनावश्यक सुविधा पुरवत गाव पूर्णतः बंद कसे ठेवता येईल, हे पाहणे गरजेचे बनले आहे. मागील वर्षी येथे फलटण तालुक्यात पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर लॉकडाऊन काळात रुग्णसंख्या कमी-जास्त पाहावयास मिळाली. दरम्यानच्या काळात कोरोनामुळे काहींचा उपचारादरम्यान मृत्यूदेखील झाला होता. पुढे काही महिने गावात बरेच दिवस कोरोना रुग्ण सापडला नाही. मात्र, पुन्हा या मार्च महिन्यात कोरोनाबाधित आढळून आले. केवळ पंधरा दिवसांतच या संख्येने शंभरी पार केल्याने सारेच अवाक् झाले आहेत. तालुक्यात सर्वदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या व अनेक राजकीय नेतेमंडळींना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मोलाची ताकद देणाऱ्या या गावातील कोरोनाची आकडेवारी पाहता सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे तसेच या मंडळीचे या गावाकडे लक्ष आहे की नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.