सातारा : आजपर्यंत आक्रमक पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत भलतीच कोंडी झाली आहे. ‘शरद पवार यांच्याशी बोलल्यानंतरच रवी साळुंखेंच्या राजीनाम्याचा निर्णय घेऊ,’ अशी स्पष्ट भूमिका खासदार उदयनराजेंनी घेतल्यामुळे त्यांची ‘चाय पे चर्चा’ होणार कधी अन् आपली ‘दुधात पडलेली माशी’ बाहेर काढणार कधी, असा यक्षप्रश्न पक्षापुढे पडला आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात जिल्हा परिषदेची निवडणूक होत असून, त्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी बदलांचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यांपासूनच पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. त्याला मुहूर्त मिळाला तो जानेवारी महिन्यात. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगूनही अध्यक्ष माणिकराव सोनवलकर सोडून इतरांनी राजीनामा दिला नव्हता. उलट उपाध्यक्षांसह पाचजणांनी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकविला. ‘आम्हाला काम करण्यासाठी कमी कालावधी मिळाला आहे. त्यामुळे दि. ३१ मार्चपर्यंत काम करण्यासाठी कालावधी वाढवून मिळावा. नाहीतर आम्ही पक्षाचा व पदाचाही राजीनामा देतो,’ असा इशारा त्यांनी पत्राद्वारे पक्षाला दिला होता. मात्र, पक्षाने कोणाचेच लाड न करण्याचे ठरविले होते. पदाधिकाऱ्यांच्या या बंडामुळे राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील सर्व आमदारांची बैठक घेऊन निर्णय होणार, असेही सांगण्यात आले. आता या घटनेला दहा दिवस होऊन गेले आहेत. तरीही कोणतीही बैठक झालेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची नरमाई व खामोशीची भूमिका स्पष्टपणे दिसून येऊ लागली आहे. त्यातच खासदार उदयनराजे भोसले हे आक्रमक होत चालले आहेत. त्यातच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी उदयनराजेंच्या आदेशाशिवाय राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. साळुंखे यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणण्याबाबतही खलबते झाली. पण खासदार उदयनराजे यांचा आक्रमकपणा वेगळेच सांगून जाऊ लागला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सर्वच पदाधिकाऱ्यांचे नक्की होणार तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच राष्ट्रवादीची खामोशीही बरेच काही सांगून जात आहे. यावर आता तोडगा कोण व कसा काढणार, हा प्रश्न आहे. (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. येत्या दोन-तीन दिवसांत राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील सर्व आमदारांची साताऱ्यात बैठक होईल. त्यामध्ये चर्चा करून काय ते ठरविण्यात येईल. - सुनील माने, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
चाय पे चर्चा.. अन् दुधात माशी!
By admin | Published: February 01, 2016 1:05 AM