मलकापूर : मलकापुरातील तीन कनिष्ठ महाविद्यालयांसह सहा शाळांमधील १५३ पैकी ७७ शिक्षकांची मोफत कोरोना चाचणी करण्यात आली. भारती विद्यापीठात काले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने केलेल्या या तपासणीत एकही शिक्षक कोरोना बाधित आढळला नाही. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.मलकापूर शहरात ३ कनिष्ठ महाविद्यालये, ६ शाळा, २२ अंगणवाड्या, विविध संस्था व जिल्हा परिषदेच्या ११ प्राथमिक शाळांमधून ज्ञानदानाचे काम केले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली सात महिन्यांपासून शाळा बंद होत्या. मलकापुरात ३ कनिष्ठ महाविद्यालये व ६ माध्यमिक शाळांचे वर्ग सुरू करावे लागणार आहेत. त्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींची पूर्तता करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रथम शिक्षकांची कोरोना तपासणी बंधनकारक केली आहे.
या ९ शाळा-महाविद्यालयांत १५३ शिक्षक कार्यरत आहेत. या सर्वांच्या तपासणीस शुक्रवारी सुरुवात झाली. पालिका व काले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत भारती विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयात तपासणीची सोय केली आहे. शुक्रवारी एकाच दिवसात ७७ शिक्षकांची रॅपिड तपासणी करण्यात आली. या तपासणीत कोणीही बाधित आढळले नाही.