कऱ्हाड : येथील कऱ्हाड-पाटण तालुका शिक्षक सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक दि. ४ एप्रिल रोजी होत आहे. २१ जागांसाठी तब्बल २११ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गुरुवार, दि. १२ पासून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. मात्र, ही निवडणूक दुरंगी की तिरंगी होणार, हे २५ मार्च रोजीच समजणार आहे. कऱ्हाड-पाटण तालुक्यांतील प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी म्हणून या सोसायटीकडे बघितले जाते. आज संस्थेचे सुमारे २,५०० सभासद आहेत. पण होऊ घातलेल्या निवडणुकीत २,२५० सभासदांनाच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. आजवर संस्थेवर प्राथमिक शिक्षक संघाचेच वर्चस्व कायम राहिले आहे. संघामध्ये दोन गट पडल्यानंतरही सध्या संभाजीराव थोरात गटाच्या ताब्यात सत्ता आहे. होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी शिक्षक संघ (थोरात गट), शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील गट), शिक्षक समिती, शिक्षक संघटना (दोंदे गट), पदवीधर संघटना आदींच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. म्हणून तर २१ जागांसाठी प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी शिक्षक संघाचे स्वतंत्र पॅनेल असणार हे निश्चित; पण दुसऱ्या गटाचीही स्वतंत्र पॅनेलची चाचपणी सुरू आहे. तर शिक्षक समितीही इतर संघटनांना बरोबर घेऊन निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. कऱ्हाड-पाटण तालुका शिक्षक सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक १५ गटांतून होत आहे. या प्रत्येक गटातून एक उमेदवार रिंगणात असणार आहेच. याशिवाय ओबीसी, एनटी, एसटी प्रवर्गातून प्रत्येकी एक तर महिला प्रवर्गातून तीन उमेदवार अशा एकूण २१ उमेदवारांना मतदान करता येणार आहे. ही निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित आहे. (प्रतिनिधी)असे आहेत तालुकानिहाय मतदार सोसायटीच्या निवडणुकीसाठी कऱ्हाड-पाटण तालुक्यांत जास्त मतदार आहेत. शिवाय बदलीच्या कारणास्तव इतर तालुक्यातही मतदार विखुरले आहेत. तालुकानिहाय मतदार पुढीलप्रमाणे - कऱ्हाड - १०५०, पाटण - ८६८, फलटण - ५९, माण - ४२, खटाव - ९२, सातारा - ११७, वाई - ११, जावळी - ७, कोरेगाव ३०, खंडाळा - ११ २६ मार्चला चिन्ह वाटप २५ मार्चला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपणार आहे. तर २६ मार्चला उमेदवारांना चिन्ह वाटप होणार आहे. चिन्ह वाटपानंतर प्रचाराला अंतिम टप्प्यात अतिशय गती प्राप्त होणार, हे निश्चित. संघाचे नाव अन् थोरातांचे नेतृत्व प्रथमच ! शिक्षक सोसायटीच्या इतिहासात प्रथमच सत्ताधारी गट ‘सद्गुरू शिक्षक संघ पॅनेल’ अशा नावाने निवडणुकीला सामोरे जात आहे. तर शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच निवडणूक लढविली जाणार आहे. त्यामुळे राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांचे लक्ष या निवडणुकीकडे लागणार हे निश्चित.
शिक्षक सोसायटीची निवडणूक दुरंगी की तिरंगी ?
By admin | Published: March 11, 2015 9:48 PM