कुडाळ : कोरोनाच्या महामारीने आज सगळीकडेच भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अनेकांना प्राण गमवावे लागले. वाढत्या रुग्णसंख्येमुळे दवाखान्यात बेड मिळेनासे झाले. अशा परिस्थितीत सामाजिक दायित्वाची भूमिका जोपासत जावळीतील शिक्षण विभागाकडून १५ लाखांचा कोरोना मदत निधी उभारला जात आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांची बैठक घेण्यात आली होती. यानुसार जावळी तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनाच्या प्रतिनिधींची ऑनलाईन बैठक गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यामध्ये कोरोना मदत निधीबाबत जाहीर आवाहन करण्यात आले. यानुसार प्रतिशिक्षकी दोन हजार रुपये कोविड निधी जमा करण्याचे सर्व शिक्षक संघटनांनी मान्य केले. याला सर्व शिक्षकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद देत सामाजिक दायित्वाची भूमिका जोपासली जात आहे.
कोरोना महामारीमध्ये तालुक्यातील शिक्षकांनी गरजूंना धान्य वाटप तसेच आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी सहकार्य करीत माणुसकी जोपासली आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता तालुक्यात सुसज्ज असे व्हेंटिलेटर बेडयुक्त कोरोना सेंटर निर्माण करण्याची संकल्पना मांडण्यात आली. याकरिता तालुक्यातील शिक्षक, केंद्रप्रमुख, शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी आर्थिक मदत देऊन पुढाकार घेतला आहे. यावेळी सुरेश चिकणे, सुरेश जेधे, दीपक भुजबळ, सूर्यकांत पवार, सुरेश शेलार, मिलन मुळे, गणेश तोडकर आदी संघटनेचे पदाधिकारी यांनी चर्चेत सहभाग घेतला.
यावेळी जावळीच्या सभापती जयश्री गिरी,उपसभापती सौरभ शिंदे, माजी सभापती अरुणा शिर्के, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय गावडे, विजय सुतार, कांताबाई सुतार आदी उपस्थित होते. ऑनलाईन सभेत प्रांताधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते, गटशिक्षणाधिकारी कल्पना तोडरमल यांनी मार्गदर्शन केले.
चौकट :
शिक्षक व शिक्षण विभागाकडून माणुसकीची जोपासना
कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत जावळी तालुक्यातील शिक्षकांनी प्रशासनाच्या आवाहनाला साद देत तालुक्यात सुमारे सात लाख रुपये कोरोना निधी जमा करून दिला आहे. याचबरोबर गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही केले. यावेळी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि अपुरी पडणारी बेड सुविधा यामुळे तालुक्यातील शिक्षण विभागाकडून प्रतिशिक्षकी दोन हजार रुपये मदत निधी जमा करून सुमारे १५ लाख रुपये निधी जमा केला जाणार आहे. यातून आरोग्य सुविधा निर्माण होण्यास मदत होईल. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक दायित्वाची भावना जपत जावळीतील शिक्षक आणि शिक्षण विभागाकडून माणुसकी जोपासली जात आहे.