सातारा : सेवाजेष्ठ शिक्षकांकडे मुख्याध्यापकपदाचा पदभार सोपविणे अपेक्षित असताना सातारा पालिकेच्या काही शाळांमध्ये या नियमाचे उल्लंघन करण्यात आले आहे. १८ पैकी ५ शाळांच्या मुख्याध्यापकपदाची सूत्रे कनिष्ठ शिक्षकांच्या हाती सोपविली गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शिक्षकांच्या या ‘शाळे’बाबत राष्ट्रीय रोस्टर हक्क-अधिकार न्याय संघटनेने पालिका प्रशासन अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही केली आहे.
सातारा शहरात पालिका शिक्षण मंडळाच्या १८ शाळा आहे. यामध्ये तीन उर्दू माध्यमिक आहेत. यापैकी मराठी माध्यमिक पाच शाळा वरिष्ठ मुख्याध्यापक पात्र शाळा आहेत. तर उर्वरित दहा शाळा या मुख्याध्यापक पात्र नाहीत. त्यामुळे या शाळांचे प्रशासकीय कामकाज चालविण्यासाठी सर्वसाधारण सेवाज्येष्ठता यादी तयार करून सेवाज्येष्ठ शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाचा पदभार सोपविण्यात यावा, असा शासन निर्णय आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाने तयार केलेल्या सेवाज्येष्ठता यादीनुसार ज्या त्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाची सूत्रे सोपविणे क्रमप्राप्त आहे. मात्र पालिकेच्या पाच शाळांमध्ये शासन नियमांचे उल्लंघन करून कनिष्ठ शिक्षकांची मुख्याध्यापकपदी निवड करण्यात आली आहे.
सेवाज्येष्ठता यादी डावलून या निवडी करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रीय रोस्टर हक्क-अधिकार, न्याय संघटनेचे अध्यक्ष संदीप फणसे यांनी केला आहे. याबाबत पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मारुती भांगे यांना संघटनेने निवेदन दिले आहे. नियमबाह्य करण्यात आलेल्या निवडी रद्द करून वरिष्ठ व पात्र शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाची सूत्रे द्यावीत, अशी मागणी केली आहे.
(चौकट)
नगरपालिका शाळांचा स्तर का खालावतोय
- इंग्रजी माध्यमिक व खासगी शाळांची संख्या वाढली
- पालिका शाळेत प्रवेश घेण्याचे प्रमाण कमी झाले
- बहुतांश शिक्षक एकाच शाळेत दहा-पंधरा वर्षांपासून कार्यरत
- काही शिक्षकांकडून गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न
- तर काही शिक्षक नावीन्यपूर्ण योजना राबविण्यास व पटसंख्या वाढवण्यास कमी पडत आहेत
- २०१८ रोजी पालिकेच्या १८ शाळांत मिळून जवळपास २ हजार विद्यार्थी व २५० शिक्षक होते
- आता विद्यार्थी संख्या १ हजार २०० तर शिक्षकांची ८४ वर आली आहे.
(चौकट)
याची आहे गरज...
अलीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा कात टाकू लागल्या आहेत. खासगी व इंग्रजी माध्यमिक शाळांच्या बरोबरीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहेत. तीन वर्षांनंतर शिक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या जात आहेत. त्यामुळे शिक्षकांना नवीन शाळेतील विद्यार्थी घडविण्याबरोबरच विविध उपक्रम राबविण्यास वाव मिळत आहे. तर विद्यार्थ्यांचाही गुणात्मक व बौद्धिक विकास होत आहे. याच धर्तीवर पालिका शाळांमधील शिक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या तर पालिका शाळा देखील स्पर्धेत मागे राहणार नाहीत.
(कोट)
शिक्षण मंडळाने सेवाजेष्ठता यादी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. येत्या एक-दोन दिवसात यादी अद्ययावत करून सेवाज्येष्ठतेनुसार संबंधित शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सोपविली जाईल.
- मारुती भांगे, प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ