सातारा : तापमान वाढ, पावसाचे प्रमाण कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे झाडांची कमी झालेली संख्या, हे चित्र पालटून तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रकाश कदम या शिक्षकाने गेल्या दोन दशकांपासून वृक्षारोपण व संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे.कोरेगाव तालुक्यातील देऊर परिसर हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. या परिसरात मागील वीस-तीस वर्षांपूर्वी बारमाही पाणी उपलब्ध होईल एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता. मात्र वसना नदीकाठी वसलेल्या देऊर गावात दरवर्षी टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा करावा लागत आहे. मागील काही वर्षांपासून परिसरासह काही गावांना पाणीटंचाईचा प्रश्न जाणवू लागला आहे. त्याचबरोबर पर्यावरणाशी निगडित असलेल्या अनेक गंभीर प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. हे सर्व देऊर येथील शिक्षण संस्थेतील शिक्षक प्रकाश कदम यांनी यामागील कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आले की परिसरातील झाडांच्या कत्तलीमुळे यासारखे प्रश्न उद्भवत आहेत. यावर काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्यांनी वृक्षसंवर्धन मोहीम हाती घेतली. यासाठी शाळेतील विद्यार्थी आणि परिसरातील वृक्षप्रेमींना बरोबर घेऊन वृक्षारोपण केले.विद्यार्थ्यांसह कुटुंबासमवेत ज्या परिसरात भेटी देत अथवा सहलीला जात असे अशा परिसरातून ते दुर्मीळ झाडांची रोपे किंवा बिया आपल्यासोबत घरी घेऊन येतात. त्या बियांची लागवड करून त्यांचे रोप तयार करून परिसरात लागवड करतात.दुर्मीळ झाडांसाठी प्रयत्नकोल्हापूर येथून गोरख चिंच, सज्जनगड येथील बकुळा, राजस्थानहून कमी पाण्यात येणाऱ्या आंब्याच्या कुया, धुळे जिल्ह्यातून काटेसावर आधी झाडांच्या बिया आणून त्यांनी आपल्या परसबागेत रोपे तयार केली. आज त्यांच्या परसबागेत करवंद, हनुमा फळ, बाहवा, मेहंदी, गुलमोहर, जांभूळ, सीताफळ, नीलमोहर, कडुलिंबाच्या आदी रोपे आहेत.
वृक्षसंवर्धनासाठी शिक्षकाची दोन दशकांची तपश्चर्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:51 PM