सातारा : सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील नळ कनेक्शन्सचा सर्व्हे सुरू केला आहे. याकामी ४० कर्मचाऱ्यांचे पथक नेमण्यात आले असून, अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.
सातारा शहरात तब्बल ३६ हजार मिळकती असताना नळ कनेक्शन्स केवळ १६ हजार आहेत, तर सात ते आठ हजार नळ कनेक्शन्स ही अनधिकृत असल्याचे ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिले होते. याबाबत ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरात नळ कनेक्शन्सचा सर्व्हे सुरू केला आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक १९ मधील जानकर कॉलनी येथून या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे. पाणीपुरवठा विभागातील ४० कर्मचारी घरोघरी जाऊन नळ कनेक्शनची माहिती घेत आहेत. मिळकतीवर त्यांचे नाव आहे का? याची शहानिशा करून नळ कनेक्शनचा सर्व्हे करण्यात येणार आहे. या सर्व्हेमधून नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा, नगरपालिकेचा महसूल वाढावा हाच मुख्य उद्देश आहे. नळ कनेक्शनची नोंदणी नसेल त्या नागरिकांना नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंड यांनी, नळ कनेक्शन नोंद करून घेण्यास मुदत देण्यात आलेली आहे, दंडात्मक कारवाईचा बडगा उगारायचा का? नाही? याबाबतचा निर्णय नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्याशी चर्चा करून घेतला जाणार आहे. काही अपरिहार्य कारणामुळे नागरिकांनी नळ कनेक्शनची नोंद नगरपालिकेकडे केली नसल्यास नळजोडण्या शासकीय शुल्क अनामत रक्कम स्वीकारून अधिकृत केल्या जातील. त्यासाठी पालिका स्तरावर अभय योजना सुरू करण्यात आली असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी दिली.
(कोट)
कोणी अनधिकृत नळ कनेक्शनचा वापर करून पाणी वापरत असेल तर त्यांनी स्वत:हून पुढे यावे. नगरपालिकेला तशी कल्पना देऊन नळकनेक्शन तात्काळ अधिकृत करून घ्यावे. येत्या पंधरा दिवसांत सर्व्हे पूर्ण केला जाईल.
- सीता हादगे,
पाणीपुरवठा सभापती
फोटो : १८ सातारा सर्व्हे फोटो
सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरात सर्व्हे सुरू केला असून, गृहभेटीद्वारे नळ कनेक्शनच्या नोंदी केल्या जात आहेत.
लोगो : लोकमत फॉलोअप
फोटो : बामतीचा कटआऊट वापरणे (८ फेब्रुवारीच्या हॅलो १ मधील मेनलीड)