विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या वतीने सरचिटणीस आर. टी. देवकांत यांनी याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गत अनेक वर्षांपासून महापारेषण वीज कंपनीतील तांत्रिक संवर्गाच्या कर्मचाऱ्यांचा सेटअप प्रलंबित आहे. वर्ग ४ मध्ये काम करणारा तंत्रज्ञ अनेक वर्षे पदोन्नती प्रक्रियेपासून लांब आहे. यावर पर्याय काढण्यासाठी २०१६ साली सुधारित क्लबिंगचा प्रस्ताव आणला गेला. त्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणाने स्टाफ सेटअप अंमलबजावणीपासून दूर राहिले. डिसेंबर २०१८ मध्ये त्याची अंमलबजावणी झाली. मात्र, जानेवारी २०१९ मध्ये बक्षी समितीमार्फत त्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. तीन महिन्यांत हा सेटअप होईल, अशी अपेक्षा असताना हा सुधारित सेटअप जुलै २०२० मध्ये सादर केला. त्यावर पुन्हा मतमतांतरे झाली. न्यायालयानेही अंमलबजावणीचा मार्ग मोकळा केला. तरीही व्यवस्थापन अंमलबजावणी करण्यास विलंब करीत आहे. त्यामुळे ४ जानेवारी रोजी रीतसर नोटीस विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनने दिली आहे. गुरुवारी, दि. २१ रोजी विविध भागांतून धडक मोर्चाने तांत्रिक कामगार मुंबईतील प्रकाशगंगा या महापारेषणच्या मुख्यालयावर जाणार आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष रवी बारई, उपाध्यक्ष गजानन तुपे, प्रवीण पाटील, उपसरचिटणीस नितीन पवार, उत्तम रोकडे, बाळासाहेब गायकवाड, राज्य सचिव हरिराम गिते, कोषाध्यक्ष संतोष घाडगे यांनी केले आहे.
मुंबईच्या मोर्चात तांत्रिक कामगारांनी सहभागी व्हावे : देवकांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:36 AM