परळी : साताऱ्याच्या पश्चिमेस असलेल्या केळवली येथे तहसीलदार आशा होळकर यांनी अचानक भेट देऊन गावाला धोका असलेल्या महाकाय दगड व त्या भोवतालच्या परिस्थितीची पाहणी केली.
केळवली येथील धोक्याच्या ठिकाणच्या घरांना काही दिवसांसाठी स्थलांतर होण्याचे आवाहन तहसीलदार आशा होळकर यांनी केले. तसेच या वेळी त्यांनी गावातील रस्ते तसेच घरांची झालेली पडझड याचा आढावा घेतला. अचानक केळवलीला तहसीलदारांनी भेट दिल्याने ग्रामस्थ शेतीकामात व्यस्त असल्याने सर्वांशी संवाद झाला नाही. या वेळी धोकादायक ठिकाणच्या अशा कुटुंबीयांची नावे तहसीलदारांनी नोंद करून घेतली.
परळी खोऱ्यात पावसाचा जोर कायम असल्याने केळवली येथे डोंगरावरील मातीचा भराव गावातील रस्त्यांवर आला होता. तसेच काही दगड-धोंड्यांमुळे घरांचेही नुकसान झाले होते, याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले यांना ग्रामस्थांनी सांगताच त्यांनी तत्काळ जेसीबी पाठवून केळवली येथील रस्त्यांवर मातीचे लोट तसेच मोठे दगड हटवून रस्ता पूर्ववत केला.