लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राष्ट्रवादीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे जिल्हा परिषद सभापतींचा वर्षाचा कालावधी संपल्याने नवीन दावेदारांनी नेत्यांच्या कानापर्यंतच इच्छा बोलून दाखविली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडीत हे नेते कार्यकर्त्यांची इच्छा कितपत पूर्ण करतात हे येणारा काळच ठरवेल. तर दावेदारांच्या तलवारीला धार कमी असल्याने विद्यमानच कायम राहू शकतात, अशीही शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषदेची निवडणूक जानेवारी २०१७ मध्ये झाली होती. तर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असून पक्षाचे ४० हून अधिक सदस्य आहेत. पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाल संपल्यानंतर १ जानेवारीला २०२० ला अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली. त्यानंतर ९ जानेवारीला सभापतींची लॉटरी निघाली. झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर राज्य विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह पक्ष नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर अनपेक्षितपणे कृषी सभापतीसाठी कोरेगावचे मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याणसाठी माण तालुक्यातील सोनाली पोळ आणि समाजकल्याणसाठी खटावच्या कल्पना खाडे यांचे नाव जाहीर झाले. तर हे जाहीर करण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दावेदारांची समजूत घातली होती. त्यानंतर रामराजेंनी सभापतींची नावे जाहीर करून वर्षासाठी पदे असल्याचे स्पष्ट केले होते.
विद्यमान सभापतींची मुदत संपली आहे. त्यामुळे इच्छुकांनी देव पाण्यात घातले आहेत. पण, हे दावेदार आपापल्या नेत्यापर्यंतच आपली भावना पोहोचवत असल्याची माहिती आहे. त्यामुळे पक्ष बैठकीत हा मुद्दा जोरकसपणे पुढे आलाच नाही. त्यामुळे या दावेदारांच्या मागणीत जोर नसल्याची चर्चाच राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. परिणामी इच्छा असूनही सभापतीपदापासून वंचित राहण्याचीही शक्यता या दावेदारांवर येऊ शकते. तर सभापतीपद बदलाचा निर्णय झाल्यास अर्थ व शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे यांना सोडून इतर बदल होऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.
चौकट :
नेते नाराजी दूर करणार का ?
मागीलवेळी कृषी सभापतीपदासाठी फलटणमधील धैर्यशील अनपट, समाजकल्याणसाठी पाटणमधील बापूराव जाधव आणि महिला बालकल्याणसाठी माणमधील डॉ. भारती पोळ व खंडाळ्यातील दीपाली साळुंखे यांचे नाव आघाडीवर होते. पण, त्यांना राजकीय हालचालीतून थांबावे लागले. आता झेडपीची निवडणूकही वर्षावर आली आहे. त्यामुळे मागील दावेदारांची नाराजी नेत्यांना दूर करावीच लागेल. त्यासाठी विद्यमान सभापती राजीनामा देणार की त्यांनाच कायम ठेवणार हाही प्रश्न आहे.
चौकट :
दावेदारांच्या गुप्त बैठका...
सभापतीपदासाठी दावेदार असणाऱ्या काहीजणांची गुप्त बैठका झाल्या आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आपली बाजू जोरदारपणे मांडण्याची भूमिका ठरल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे काही दिवसांतच विद्यमान सभापती राहणार की दावेदारांना संधी मिळणार हे स्पष्ट होणार आहे.
....................................................................