सातारा : जिल्ह्यात उष्णतेची लाट आली असून रविवारी सातारा शहरात ४०.५ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. हे या वर्षातील आतापर्यंतचे उच्चांकी तापमान ठरले. तर एप्रिल महिन्यात चाैश्यांदा साताऱ्याचा पारा ४० अंशावर गेल्याचे दिसून आले. या उष्णतेच्या लाटेने लोकांच्या अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे.सातारा जिल्ह्यात यावर्षी उन्हाळा लवकर सुरू झाला.
फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासूनच थंडी गायब झाली. त्यामुळे ऊन वाढण्यास सुरुवात झाली होती. तर मार्च महिना उजाडल्यानंतर उन्हाची तीव्रता वाढत गेली. त्यामुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्याचा पारा ४० अंशाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. तर सातारा शहराचे कमाल तापमान ३९ अंशावर होते. त्यामुळे जिल्हावासीयांना यंदा कडाक्याच्या उन्हाळ्याला सामोरे जावे लागणार अशीच चिन्हे होती. त्याप्रमाणेच सध्या घडत असल्याचे दिसून येत आहे. कारण, एप्रिल महिन्यातच पारा उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.
सातारा शहरात रविवारी ४०.५ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. हे या वर्षातील उच्चांकी तापमान ठरले. तर एप्रिल महिन्यात चाैश्यांदा शहराचा पारा ४० अंशावर गेला आहे. रविवारी पारा एकदम वाढल्याने सातारा शहरवासिय उकाड्याने हैराण झाले होते. कारण, सायंकाळी पाचनंतरही हवेत उकाडा कायम होता. तर पूर्व भागातील माण, खटाव आणि फलटण तालुक्यातील पारा ४१ अंशावर गेला आहे. काही भागात तर ४२ अंशाजवळ तापमान पोहोचले आहे. यामुळे आगामी काळातही उष्णतेच्या झळा तीव्र होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
महाबळेश्वर पारा ३४ अंशावर...महाबळेश्वर हे थंड हवेचे आणि जागतिक पर्यटनस्थळ आहे. या उष्णतेच्या लाटेत महाबळेश्वरचा पाराही वाढला आहे. रविवारी ३४.१ अंश तापमानाची नोंद झाली. हे गेल्या काही दिवसांतील सर्वाधिक तापमान ठरले आहे. महाबळेश्वरचा पारा एका दिवसांत एक अंशाने वाढला आहे.
१५ ते १७ एप्रिलदरम्यान पारा ४० अंशावर...
एप्रिल महिन्यात साताऱ्याचा पारा बहुतांशीवेळा ३९ अंशावर राहिला आहे. तर १५ ते १७ एप्रिलदरम्यान सलग तीन दिवस कमाल तापमान हे ४० अंशावर होते. १६ एप्रिलला ४०.३ अंशाची नोंद झाली होती. त्यानंतर २८ एप्रिलला साताऱ्याचा पारा ४०.५ अंश नोंद झाला.