सातारा : जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमान सतत वाढत चालले असून दोन दिवसांत साताऱ्यातील पारा ३९ अंशावर राहिला आहे, तर दुष्काळी भागात ४० अंशापर्यंत तापमान पोहोचले आहे. यामुळे पश्चिमेकडील नागरिक उकाड्याने , तर दुष्काळी भागातील लोक उन्हाच्या तीव्र झळांनी हैराण झाले आहेत.
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धापासून किमान तसेच कमाल तापमानात वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. कमाल तापमान तर सतत ३५ अंशावर होते. मार्च महिन्यातच कमाल तापमानही ३९ अंशापर्यंत पोहोचले होते, तर आता एप्रिल महिना सुरू झाल्यापासून पहिले चार दिवस कमाल तापमान ३८ अंशापर्यंत होते. मात्र, ५ आणि ६ एप्रिलला तापमानात जवळपास एक ते दीड अंशाने वाढ झाली.
सातारा शहरात सोमवाारी कमाल तापमान ३९.०२, तर मंगळवारी ३९ अंशावर होते. यामुळे लवकरच पारा ४० वर जाण्याची चिन्हे आहेत. तसेच ऊन वाढल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. रात्रीच्यावेळी उकाड्याने नागरिक हैराण होत आहेत, तर ग्रामीण भागात उन्हामुळे शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. शेतकरी वर्ग सकाळी व सायंकाळच्या सुमारास शेतीची कामे करत आहे.
चौकट :
सातारा शहरातील कमाल तापमान असे :
दि. २८ मार्च ३८.०५, दि. २९ मार्च ३८.०९, दि. ३० मार्च ३७.०३, दि. ३१ मार्च ३८.०४, दि. १ एप्रिल ३८.०२, दि. २ एप्रिल ३७.०७, दि. ३ एप्रिल ३७.०३, दि. ४ एप्रिल ३८.०१, दि. ५ एप्रिल ३९.०२ आणि ६ एप्रिल ३९
................................