सातारा : शहरालागत महामार्गावरील वाढे फाट्याच्या पुढे पिकअपचा अपघात झाल्यानंतर त्यातून विषारी द्रवाची गळती झाली. या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहनचालकांना विषाच्या धुराची बाधा होत अनेकांना डोळ्यांची जळजळ तसेच उलट्यांचा त्रास झाला. सुमारे अर्धा तास हा थरार सुरू होता. वाहनातील दोघेजण जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महामार्गावरुन पिकअप वाहन जात असताना वाढे फाटा येथे अपघात होऊन तो पलटी झाला. पलटी होताच त्यातून पिवळ्या धुराचे लोट वाहू लागले. अपघातात चालकासह आणखी एक जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी त्यांना बाहेर काढत तत्काळ उपचारासाठी वाहनाची सोय केली. ही सर्व प्रक्रिया होत असतानाच पाहता पाहता काही क्षणांत तेथील नागरिकांना व तेथून जाणाऱ्या वाहनचालकांना त्या पिवळ्या धुराचा त्रास होऊ लागला. यामुळे पळापळ होऊ लागली.
ही बाब पाहिल्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांनी वाहने जागेवरच थांबवत काही जणांना माघारी जाण्यास सांगितले. पिवळा धूर न थांबता तो अधिक प्रमाणात आकाशाच्या दिशेने फोफावू लागला. त्यातील उग्र वासामुळे परिसरात नागरिक व वाहनचालकांना त्याचा त्रास झाला. अनेकांचे डोळे जळजळू लागले, घशाला त्रास होऊ लागला तर अनेकांना श्वास घेण्यास अडथळा येऊ लागला. यामुळे परिसर हादरून गेला.
या घटनेची माहिती पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अंदाज बांधत लांबूनच त्याबाबतची माहिती घेतली. प्राथमिक माहितीनुसार त्या पिकअपमध्ये केमिकल्सच्या बाटल्यांचा साठा होता. एमआयडीसी परिसरात तो लागत असल्याने निघाला होता. मात्र त्याचा अपघात झाल्याने त्यातून विषारी द्रव बाहेर पडला.
नेमका हा द्रव काय होता आणि हा टेम्पो कुठे चालला होता याची माहिती पोलीस घेत असून रात्री उशिरापर्यंत या अपघाताची सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.
फोटो : जावेद खान