सातारा : येथील सुरुचि बंगल्यावरील धुमश्चक्रीप्रकरणात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाच्या सातजणांना मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी दि. २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.सुमारे दीड महिन्यापूर्वी येथील सुरुचि बंगल्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटांत जोरदार धुमश्चक्री उडाली होती.
यावेळी फायरिंग, गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तीन गुन्हे नोंद झाले होते. दोन्ही गटांच्या शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद झाला होता. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही राजे गटांतील वीसहून अधिक समर्थकांना अटक झाली होती. तर अनेकजण पसार झाले होते. काहींनी सातारा जिल्हा न्यायालय अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. यातील आमदार गटाचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, फिरोज पठाण, विक्रम पवार, माजी नगरसेवक जयेंद्र चव्हाण, अन्सार आत्तार, मुख्तार पालकर व मयूर बल्लाळ यांचा जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणीनंतर या सातजणांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी आता दि. २९ रोजी होणार आहे.