सातारा : बोगदा सोडला की अवघ्या एक किलोमीटर अंतरावर टपोऱ्या जांभळांच्या झाडांची रांग होती. सुमारे पाच दशके या झाडांनी उन्हाळ्यात प्रवाशांना सावली आणि गोड जांभळे देऊन तृप्त केलं. पण रस्त्यालगत असणाऱ्या जागेचा फ्रंट या वृक्षांच्या जीवावर उठला. या रस्त्यावर आपले जेमतेम अस्तित्व टिकवून असणाऱ्या दोन-तीन झाडांचे बुंधे पेटवून दिल्याने एकेकाळी झाडांची दाट सावली असलेला हा रस्ता पूर्णपणे बोडका झाला आहे.
काही वर्षांपूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत जांभळं खायला जाण्याचं मुलांचं आणि अवघ्या सातारकरांचं हक्काचं ठिकाण म्हणजे डबेवाडी ! उताराने गाडी लागली गाव लागायच्या आधी टपोऱ्या जांभळांचे भले मोठी वृक्ष सावली करून प्रवाशांच्या स्वागतासाठी जणू उभे असायचे. या रस्त्यावर पन्नासहून अधिक जांभळांची झाडे वीस-वीस फुटांच्या अंतरावर होती. हातातला दगड भिरकावला की जांभळांचा सडा रस्त्यावर पडायचा; पण आत्ता येथील स्थिती पाहिली तर यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही.
उन्हाळ्याची सुट्टी लागली की, लहान मुलांचे ग्रुप या रस्त्यावर जांभळांसाठी अक्षरश: धुडगूस घालायचे. वाहनांची वर्दळही फार नसल्यामुळे येथे सुरक्षितता होती. विशेष म्हणजे या जांभळांमध्ये अजिबात तुरटपणा नव्हता. गोडीलाही ही जांभळे उत्कृष्ट होती.
मात्र, गेल्या काही वर्षांत झाडांच्या बुंध्यात आग लावून झाड पाडण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. या प्रकारामुळे सावलीबरोबरच दर्जेदार जांभळांच्या वाणाचेही अस्तित्व या कृत्यामुळे धोक्यात आले आहे. राजरोसपणे बांधावरील झाडे जाळणाऱ्या समाजकंटकांवर वन विभागाने कारवाई करण्याची मागणी निसर्गप्रेमींमधून होत आहे.
............
वसाहत वाढली... झाडे कमी झाली !
गेल्या काही वर्षांत बोगद्याबाहेरील परिसरालाही शहरीकरणाचे रूपडे येऊ लागले आहे. या परिसरात हॉटेल्सबरोबरच घरांचीही संख्या चांगलीच वाढली आहे. अलिशान घर, अंगणात बगीचा अशा संकल्पना येथे रुजल्या; पण मानवाचा वावर येथे वाढला आणि या रस्त्यालगतच्या झाडांची संख्या झपाट्याने खालावली.
पॉईंटर :
सज्जनगड आणि ठोसेघर यापेक्षाही या परिसरात आता शैक्षणिक संकुल उभे राहिले. नैसर्गिक वरदानाबरोबरच विद्येची नवीन दालने खुली झाल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर तरुणाईची वर्दळ वाढली. या परिसरात हॉटेल, रेसॉर्ट आणि चुलीवरच्या जेवणांची लज्जत घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत वर्दळ सुरू झाली. त्यामुळे हा रस्ता आणि त्याच्याशेजारील जागेला सोन्याचा भाव आला. तोच या झाडांच्या मुळावर उठला.
झाड पेटविण्याचे कारण?
वन विभागाच्या कायद्यात वृक्षतोड करणाऱ्याला शिक्षा आणि आर्थिक दंड भरावा लागतो. त्यामुळे बांधावरील झाडे तोडण्यापेक्षा बुंध्यात चिंद्या कोंबून त्यावर पेट्रोल किंवा रॉकेल ओतून ही झाडे रात्रीच्या अंधारात पेटवली जातात. याविषयी वन विभागाकडे तक्रार झालीच तर बांधावरील गवताने पेट घेतला व त्यातच ही झाडे जळाली, असा बचाव करता येतो.
रात्रीत पेटवले
बोगद्याबाहेर रोज सकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दिवसभरही येथे चांगलीच वर्दळ असते. म्हणूनच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हे झाडांचे बुंधे जाळण्यात आले. रात्री दहा ते अकराच्या दरम्यान हा प्रकार केला जातो. हे बुंधे ओले असल्यामुळे ते जळण्यास चांगलाच वेळ लागला. तीन-तीन दिवस बुंध्यातील आग धुमसत राहते. या धुमसणाऱ्या बुंध्यांवर पाणी ओतण्याचे कर्तव्यही कोणी केले नाही.
फोटो ओळ :
बोगदा ते डबेवाडी या रस्त्यावर पूर्वी जांभळांच्या झाडांची मोठी रांग होती. ऐन उन्हाळ्यातही या रस्त्यावर गारवा होता. वाढत्या नागरिकरणाच्या नावाखाली हा रस्ता पूर्ण बोडका झाला आहे. (जावेद खान)
....................