म्हसवड : ढाकणी (ता. माण) या गावात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढू लागल्याने आपत्ती व्यवस्थापन समितीने गावात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुढील दहा दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला असून, आपत्ती व्यवस्थापन समिती व वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामपंचायत ढाकणी अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली. यावेळी सरपंच दत्ताभाऊ शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरी शळके, डॉ. मनोज ओंबासे, आरोग्य सेवक अधिक कांबळे, ग्रामसेवक दिनेश काशिद, अंगणवाडी सेविका शशिकला खाडे, प्रियंका ओंबासे, वैशाली खाडे, आशा वर्कर जया काळेल, संगीता नरबट, ग्रामपंचायत सदस्य आप्पा खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बैठकीत पुढील दहा दिवस गावात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ताभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी समितीने काही कठोर पावले उचलली आहेत.