दत्ता यादव ल्ल सातारा पाचशे, हजारांच्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यात एकही चोरी अथवा लाचखोर सापडला नाही. त्यामुळे पोलिस निर्धास्त आहेत. नोटा बंद होण्यापूर्वी जिल्ह्यात सरासरी रोज दोन तरी घरफोड्या तसेच किरकोळ चोऱ्या होत होत्या. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढत होती. सातत्याने घरफोडी होत असल्यामुळे नागरिकांच्या रोषालाही पोलिसांना सामोरे जावे लागत होते. त्यातच क्राईम रेटही वाढत होता. मात्र, जसा पाचशे, हजारांच्या नोटा बंदीचा निर्णय झाला. तसे सर्वच क्षेत्रांतील व्यवहार अचानक ठप्प झाले. बघेल तिकडे नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांच्या एटीएममध्ये रांगा दिसू लागल्या. जुन्या नोटा घेणे बंद केल्याने अनेकांचे धाबे दणाणले. तसे चोरट्यांचेही झाले. घरफोडी केली तर जुन्याच नोटा सापडणार, पुन्हा या नोटा बँकेत भरताना कुठून पैसे आणले, याची विचारणा होणार, त्यामुळे चोरी न केलेलीच बरी, असे चोरट्यांना वाटले तर नवलंच; पण हे खरे आहे. सातारा शहरामध्ये दिवाळीनंतर एकही घरफोडी झाली नाही. त्यामुळे पोलिसांची ‘डायरी’ कोरीच आहे. फसवणूक, मारामारी, अपघात असे गुन्हे सध्या पोलिस ठाण्यात दाखल होत आहेत. आॅक्टोबरमध्ये जिल्ह्यात २३ घरफोड्या झाल्या. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ६ आणि नोट बंदी झाल्यानंतर एकही घरफोडी झाली नाही, याचे कुतूहल सध्या पोलिसांनाही आहे. नोटबंदी ही पोलिसांच्या पथ्यावरच पडल्याचे पाहायला मिळत आहे. तपासासाठी मिळाला वेळ ! एका पोलिसाकडे ३० ते ३५ गुन्हे दर महिन्याला तपासासाठी येत असतात. त्यामध्ये घरफोडीचेही गुन्हेही बरेच असतात. या गुन्ह्यांचा तपास करतानाच पोलिसांना नाकीनऊ येत असते; मात्र नोटा बंदीच्या निमित्ताने चोरट्यांनीही पाठ फिरविल्याने पोलिसांना पेडींग गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी वेळ मिळू लागला आहे. नाही तर काही दिवसांपूर्वी रोज एकतरी तपासाचा गुन्हा पोलिसांकडे येत होता; परंतु आता पोलिसांना तपासासाठी वेळ आणि वेळच मिळत आहे. लाचखोरांनाही हवी नवी नोट ! लाचलुचपत विभागाने जिल्ह्यात कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. नोटबंदीनंतर मात्र लाचखोरीची एकही कारवाई झाली नाही. लाचखोरांनाही म्हणे नव्या कोऱ्या नोटा हव्या आहेत. त्यामुळे लाचलुचपत विभागही सध्या लाचखोराच्या प्रतीक्षेत आहे.
दहा दिवसांत जिल्ह्यात ना चोरी ना लाचखोरी !
By admin | Published: November 18, 2016 11:03 PM