शेंद्रे : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सातारा तालुक्यातील शेंद्रे ग्रामपंचायतीच्यावतीने दि. ३ जुलैपासून दहा दिवसांचा कडक जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत ग्रामस्थांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे,’ असे आवाहन शेंद्रे ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.
शेंद्रे गावात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या जनता कर्फ्यूमध्ये दवाखाने, मेडिकल वगळता गावातील सर्व प्रकारची दुकाने दि. १२ जुलैपर्यंत बंद राहतील. गावातील सर्व दुकानदार, व्यावसायिकांनी या जनता कर्फ्यूमध्ये सहभागी व्हावे तसेच या जनता कर्फ्यूमध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास ग्रामपंचायतीच्यावतीने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायतीच्यावतीने शेंद्रे गावात ॲंटिजन व आरटीपीसीआर तपासणी मोहीम आयोजित केली असून, ग्रामस्थांनी तपासणी करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.