पुसेगाव : ‘श्री सेवागिरी महाराज की जय,’ ‘ओम नमो नारायणा’च्या जयघोषात, मोठ्या भक्तिमय व उत्साही वातावरणात शुक्रवारी श्री सेवागिरी महाराजांचा ६९ वा रथोत्सव सोहळा पार पडला. टाळ मृदंग, ढोल-ताशे, भजन आणि श्री सेवागिरी महाराजांच्या चरित्रावरील गीतांमुळे पुसेगाव सुवर्णनगरी ‘सेवागिरीमय’ झाली होती. महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात व इतर राज्यांमधील १० लाखांहून अधिक भाविक, यात्रेकरूंनी रथोत्सवासाठी हजेरी लावली. रथोत्सवाची मिरवणूक तब्बल १२ तास चालली. भाविकांनी श्रींच्या रथावर मोठ्या मनोभावे १०, २०, ५०, १०० ५०० तसेच नव्या २००० रूपयांच्या नोटांच्या माळा मनोभावे अर्पण केल्या. बुधवारी पहाटे श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, रणधीर जाधव, सुरेश जाधव व ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीस अभिषेक, मंत्रपुष्पांजली अर्पण करून आरती करण्यात आली. प्रारंभी श्री सेवागिरी महाराजांची प्रतिमा व पादुकांचे विधिवत पूजन करून फुलांनी सजवलेल्या मानाच्या रथामध्ये त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली.सकाळी ११ वाजता पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांच्या हस्ते व मठाधिपती सुुंदरगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली रथपूजन करण्यात आले. यावेळी सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे, आ. आनंदराव पाटील, सरपंच दीपाली मुळे, किरण बर्गे, प्रांत दादासाहेब कांबळे, तहसीलदार सीमा होळकर, पंचायत समिती सभापती मनीषा सिंहासने, गटविकास अधिकारी डॉ. तानाजीराव लोखंडे यांच्यासह ग्रामस्थांची प्रमुख उपस्थिती होती.श्री सेवागिरी महाराजांच्या रथ मिरवणुकीस सकाळी १० वाजता प्रत्यक्षात प्रारंभ झाला. यावेळी टाळ-मृदंगाच्या गजरात ढोल-ताशे, सनई व बँडपथकाच्या निनादामुळे सर्व वातावरण ‘सेवागिरीमय’ झाले होते. दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी मोठ्या श्रद्धेने नारळ, बेलफूल, पुष्पहार, पेढे व नोटांच्या माळा रथावर अर्पण केल्याने श्री सेवागिरी महाराजांचा मानाचा रथ सकाळी ११ वाजताच नोटांनी शृंगारला होता. रथाच्या उजव्या बाजूने भाविकांची जाण्याची व डाव्या बाजूने येण्याची व्यवस्था केली होती.रथयात्रेस सकाळी ११ वाजता मंदिरापासून प्रारंभ झाला. ही मिरवणूक सातारा-पंढरपूर या मार्गाने शासकीय विद्यानिकेतनपर्यंत यात्रास्थळावर पोहोचली. यात्रास्थळावरून मिरवणूक परतल्यानंतर जुन्या टपाल कार्यालय रस्त्याने ती पुन्हा रात्री उशिरा मंदिरात परतली. या मुख्य पोस्ट कार्यालयमार्गे मंदिर अशी तब्बल बारा तास रथ मिरवणूक चालली. रथाभोवती तसेच दर्शनरांगेवर व गर्दीच्या नियंत्रणासाठी पोलिस प्रशासनाने चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. रथयात्रा संपल्यानंतर रथावरील नोटांच्या माळा व देणगी रक्कम पोलिस बंदोबस्तात एकत्र करून श्री नारायणगिरी महाराज भक्त निवासात नेण्यात आली. येथील विविध बँकेचे अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवकांनी या रकमेचे मोजण्याचे काम सुरू केले. रात्री उशिरापर्यंत रक्कम मोजण्याचे काम सुरू होते. (वार्ताहर)दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगाश्री सेवागिरी मंदिरात श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने भक्तांना बुंदी प्रसादाचे मोफत वाटप करण्यात येते होते. याकामी स्वयंसेवकांसह शालेय विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री सेवागिरी मंदिरास आकर्षक रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सुवर्णनगरीमध्ये आलेल्या भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने श्री सेवागिरी मंदिरात संजीवन समाधीच्या दर्शनासाठी बुधवारी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. बैलबाजार पाहण्यासाठी गर्दीजातिवंत खिल्लार जनावरांचा बैलबाजार पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यात्रेत बालगोपाळ, युवक, युवतींसह यात्रेकरूंनी रेल्वे, धडकगाडी, आकाशी पाळण्यात बसण्याचा आनंद लुटला. आकाश पाळण्याभोवती हौशी मंडळींनी तुफान गर्दी केली होती. मिठाई स्टॉल, मनोरंजन साहित्य, स्वेटर, हॉटेल व विविध दुकानांमध्ये खरेदीसाठी यात्रेकरूंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
दहा लाख भाविक... नव्या नोटाही अर्पण
By admin | Published: December 29, 2016 12:28 AM