पाटण तालुक्यात फेब्रुवारी महिन्यात आजअखेर २१ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पाटील यांनी दिली. आत्तापर्यंत तालुक्यात २ हजार १७३ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. त्यामध्ये ११९ बाधितांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, मध्यंतरी तालुक्याला पहिल्या टप्प्यात कोरोना लसीचे ३ हजार २२५ उद्दिष्ट होते. त्यापैकी २ हजार २०० व्यक्तींना लस देण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य, महसूल, पोलीस, ग्रामपंचायत आदी विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, कोविड योद्ध्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सध्या सुरू आहे. कोरोनाची सर्वत्र वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता तालुक्यातील जनतेने याबाबत सावधानता बाळगावी. योग्य ती खबरदारी घेऊन नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन श्रीरंग तांबे व डॉ. आर. बी. पाटील यांनी केले आहे.