सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या दहाजणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या बाधित महिलेच्या संपर्कात आणखी कोणी आले आहे का, याचा प्रशासन शोध घेत आहे.जिल्हा शासकीय रुग्णालयातील ३६ वर्षीय महिला कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे बुधवारी निष्पन्न झाले होते. ही संबंधित महिला कोरोना बाधित व्यक्तींचे एक्सरे काढण्याचे काम करत होती. त्यामुळेच या महिलेला कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर येत आहे. या महिला कर्मचाºयाच्या संपर्कात आलेल्या सिव्हिलमधील तीन तर ती राहत असलेल्या परिसरातील सातजणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयात पहिल्यांदाच कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने सर्व कर्मचारी धास्तावले आहेत. त्यामुळे अनेकजण रजा घेण्याच्या विचारात आहेत. संबंधित कोरोना बाधित महिलेचा सिव्हिलमध्ये वावर होत होता. त्यामुळे बरेच कर्मचारी या महिलेच्या निकटसहवासात आले असण्याची शक्यता आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी आपापली काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी केले आहे.