आॅनलाईन लोकमत
वाई (सातारा),दि. 15 - वाई शहरात खासगी शिकवणीच्या नावाखाली बारावीच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी दहा हजार रुपये घेऊन संबंधित शिकवणी चालकाने रात्रीत पोबारा केल्याची तक्रार वाई पोलिस ठाण्यात वाई, खंडाळा, महाबळेश्वरच्या विद्यार्थ्यांसह पालकांनीही दिली आहे.
वाई पोलिस व विद्यार्थ्यांकडून मिळालेली माहिती अशी की, वाई एसटी आगाराजवळ ‘आॅस्कर’ क्लासेस नावाने संदीप पोतदार हा काही दिवसांपासून बारावीच्या विद्यार्थ्यांची शिकवणी घेत होता. संदीप पोतदार याने प्रत्येक विद्यार्थ्याकडून दहा हजार रुपये प्रवेश शुल्क घेतले. या ठिकाणी वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी संबंधित शुल्क भरले आहेत. ते सोमवार, दि. ६ पासून या क्लासकडे हेलपाटे मारत असून, त्याठिकाणी कुलूप लावलेले पाहायला मिळत आहे.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी ही बाब पालकांना सांगितली असता एकच खळबळ उडाली. पालकांनी विद्यार्थ्यांना घेऊन संदीप पोतदार याच्या विरोधात वाई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच संदीप पोतदार याच्याकडून पैसे वसूल करून देण्याची विनंतीही निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनावर धनराज रायते, ओंकार निकम, शुभम फरांदे, सुमित लोखंडे, ओंकार बाबर, कुणाल शिंदे, अभिजित पिसाळ, शुभम डेरे, ऋषिकेश जगताप, तुषार सणस, विक्रांत एरंडे, गणेश ढेबे, संकेत गलंडे, शेखर काळोखे, प्रतीक साळुंखे, शेखर कोचळे, हर्षद कोकरे यांचा समावेश आहे. संदीप पोतदार यांच्या विरोधात वाई पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, सहायक पोलिस निरीक्षक शिरीष शिंदे तपास करीत आहेत.