पाचगणी : गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने महाबळेश्वर तालुक्याच्या पश्चिम भागात दाणादाण उडवली असून, चतुरबेट येथील कोयनेचा पूल पाण्याखाली गेल्याने दहा गावे संपर्कहीन झाली आहेत.
महाबळेश्वर तालुक्यातील चतुरबेट, दाभेमोहन, दाभे दाभे, शिरनार, खरोशी, घोणसपूर, शिंदेवाडी ही गावे कोयनेच्या पलीकडे असल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे. पहिल्यांदाच एवढा मोठा पाऊस झाल्याने हा पूल पाण्याखाली गेला आहे. त्याचबरोबर येथील दूरध्वनी यंत्रणा कोलमडून पडली आहे. विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
आठवडाभर रिमझिम पडणाऱ्या पावसाने अचानक रौद्ररूप धारण केल्याने या परिसरातील कोयना, सोळशी, कांदाटीसारख्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर छोटे-मोठे ओढेसुद्धा ओव्हरफ्लो झाल्याने पाणी रस्त्यावर आले आहे. मुळातच हा परिसर पर्जन्यवृष्टीचा आहे. मात्र, यावर्षी पावसाने कहरच केला आहे. कोयना नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे तर पावसाचा जोर वाढतच असल्याने परिसरातील लोकांची मात्र अवस्था बिकट झाली आहे.
पॉईंटर
मागच्या आठवड्यात शिरवली मार्गावर दरड कोसळली होती.
आता तर चतुरबेट पूलच पाण्याखाली गेल्याने दहा गावांचा संपर्क तुटला आहे.
चौकट : कोयना नदीला एवढा पूर कधीच आला नसल्याचे येथील लोक सांगत आहेत. यावर्षी पावसाने कहरच केला असल्याचे म्हटले जात आहे.
सोबत फोटो आहे : चतुरबेट येथील कोयना नदीपूल गेल्या दोन दिवसांपासून पाण्याखाली आहे.