भीषण अपघातानंतर देऊरमध्ये तणाव !ट्रेलरखाली चिरडून २ ठार : २ जखमी; पोलीस गाडीवर दगडफेक; अधिकाऱ्याने रोखले पिस्तूल+वाठार स्टेशन : सैन्यात भरती होण्यासाठी धावण्याचा सराव करणाऱ्या चार युवकांना गुरुवारी पहाटे देऊर रेल्वे गेटजवळ भरधाव ट्रेलरने चिरडले. यात दोन युवक जागीच ठार झाले, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. दरम्यान, घटनास्थळी उशिरा आलेल्या पोलीस गाडीवर संतप्त जमावाने दगडफेक केल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी जमावावर पिस्तूल रोखले. त्यामुळे देऊरमध्ये दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अक्षय महेंद्र कदम (वय २०), गणेश दिलीप धुमाळ (२०) अशी ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील देऊर येथील सहा-सात युवक पोलीस, लष्करात भरती होण्यासाठी धावण्याचा सराव करीत होते. नेहमीप्रमाणे गुरुवारी पहाटे हे युवक देऊर रेल्वे गेटजवळ धावत असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रेलरने (पीबी २३ - एम ७७३५) चार तरुणांना चिरडले. यापैकी अक्षय कदम, गणेश धुमाळ हे दोघे जागीच ठार झाले, तर मयुर मोहन कदम (२०) व इंद्रजित नारायण देशमुख (२२) हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच देऊर ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. काहीजणांनी वाठार स्टेशन पोलिसांनाही याबाबत कळविले. मात्र, एक तासानंतर पोलीस पोहोचल्यामुळे जमाव आक्रमक बनला. शाब्दिक चकमकही उडाली. जमावाने पोलीस गाडीवर दगडफेकही केली. तेव्हा सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी जमावावर पिस्तूल रोखले. हे पाहताच जमाव अधिकच चिडला. मात्र, अमोल आवळे आणि हरिदास भोसले यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक हुंबरे, लोणंदचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप भोसले तसेच भुर्इंजचे सहायक पोलीस निरीक्षक नारायण पवार हेही घटनास्थळी दाखल झाले. दंगाविरोधी पथकालाही पाचारण करण्यात आले. यानंतर या दोन तरुणांचे शवविच्छेदन करून आलेल्या रुग्णवाहिका ग्रामपंचायतीसमोर उभ्या केल्या गेल्या. त्यावेळी जमावाकडून वाठार पोलिसांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या गेल्या. हुंबरे यांनी जमावाच्या भावना ऐकून घेऊन भ्रमणध्वनीवरून वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत पोहोचविल्या. अखेर अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर हेही देऊर येथे पोहोचले. त्यांच्या समोरही ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. निकम यांच्या निलंबनाच्या मागणीचे निवेदन त्यांनी दिले. शेवटी कलासागर यांनी केलेल्या विनंतीनंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ट्रेलरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)गणेशच्या जाण्याने आईचा आधार हरपलामृत गणेश धुमाळ हा एकुलता मुलगा होता. तो दोन वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून त्याला आईने लहानाचे मोठे केले. तो सध्या कला शाखेच्या दुसऱ्या वर्षाला होता. त्याच्या घरी आई, बहीण, आजी आहेत. गणेशच्या जाण्याने आईचा आधार हरपला आहे. आई, आजी व बहिणीने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.कदम कुटुंबीय सुन्नअक्षय कदमचे वडील शेती करतात. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताचीच आहे. मोलमजुरी करूनच उदरनिर्वाह करणारे हे कुटुंब आहे. अक्षयच्या जाण्याने कदम कुटुंबीय सुन्न झाले होते.मित्रांना मानसिक धक्कासैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून सात तरुण धावण्याचा सराव करीत होते. त्यातील दोघांचा जागीच मृत्यू, तर दोघे जखमी झाले. डोळ्यासमोरच दोन जीवलग मित्र ठार होण्याच्या घटनेचा अनिकेत भोसले व संग्राम कदम यांना मानसिक धक्का बसला असून, त्यांच्या तोंडून शब्दही निघत नव्हते.
भीषण अपघातानंतर देऊरमध्ये तणाव !
By admin | Published: February 11, 2016 10:49 PM