पुसेसावळी/सातारा : पुसेसावळी (ता. खटाव) येथे रविवारी रात्री उसळलेल्या दंगलीनंतर विस्कळीत झालेले जनजीवन अद्यापही जैसे थे आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून कडक पोलिस बंदोबस्त तैनात आहे. दंगलप्रकरणी आणखी नऊ जणांना अटक करण्यात आली असून अटकेतील संशयितांची संख्या ३१ झाली आहे. तांत्रिक माहिती व सीसीटीव्ही फुटेजद्वारे धरपकड सत्र सुरूच आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने इंटरनेट सेवा अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे इंटरनेट सेवा दुसऱ्या दिवशीही बंद होती.पुसेसावळी येथे आक्षेपार्ह पोस्टवरून रविवारी रात्री दंगल उसळली. या घटनेनंतर प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. गावातील अत्यावश्यक सेवा वगळता मंगळवारीही बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे गावात पूर्णपणे शुकशुकाट जाणवत होता. परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
साताऱ्यात कडकडीत बंदपुसेसावळी येथील उसळलेल्या दंगलीच्या निषेधार्थ मंगळवारी सातारा बंद ठेवण्यात आला. व्यावसायिकांनी आपली दुकाने स्वत:हून बंद ठेवली होती. शहरात रिक्षा आणि एसटीची सेवा मात्र सुरळीत होती.
साताऱ्यात मूक मोर्चाला पोलिसांकडून मज्जावपुसेसावळी येथील घटनेच्या निषेधार्थ सातारा शहरात विविध पुरोगामी संघटनांनी आयोजित केलेल्या मोर्चाला जमावबंदीचे कारण सांगत पोलिसांनी मज्जाव केला. यामुळे जमलेल्या नागरिकांनी मूक मोर्चा काढणारच, असा आग्रह धरत ‘जेल भरो’चा इशारा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरच ठिय्या मांडला. पोलिसांनी विनवण्या करूनही जमाव ऐकत नसल्याने अखेर पोलिसांनी ॲड. वर्षा देशपांडे यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेतले. यामुळे शाहू चौकात दोन तास गोंधळाचे वातावरण होते. अखेर पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी शनिवारी मोर्चासाठी लेखी परवानगी दिल्यानंतर जमाव पांगला.